वृत्तसंस्था/ राजकोट
रणजी चषक विजेता सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यात इराणी करंडक सामन्याला रविवारपासून येथे प्रारंभ होणार आहे. चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, उनादकट यांच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष राहील. शेष भारत संघाचे नेतृत्त्व हनुमा विहारीकडे तर सौराष्ट्रचे नेतृत्त्व जयदेव उनादकटकडे सोपविण्यात आले आहे.
शेष भारत संघामध्ये अगरवाल, यश धूल, मुलानी, सर्फराज खान, सौरभ कुमार, यश दयाल, नवदीप सैनी, आकाशदीप यांचा समावेश आहे. सौराष्ट्र संघामध्ये अर्पित वासवदा, चिराग जेनी, पार्थ भुत, डी. जडेजा, हर्विक देसाई यांचा समावेश आहे. 2023 च्या क्रिकेट हंगामाला या सामन्याने प्रारंभ होत आहे. मात्र गेल्या जुलैमध्ये विंडीज दौऱ्यासाठी पुजाराला वगळण्यात आले होते. त्यामुळे या सामन्यात पुजाराच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष राहील. चालू वर्षाच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याने पुजाराच्या निवडीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान पुजाराने मध्यंतरी इंग्लिंश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता.