गोवा टीएमसीचे समिल वळवईकर यांचा सवाल
प्रतिनिधी/पणजी
जुने गोवे येथील वारसा झोनमधील कथित बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश दिल्याचे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले. तरीही आदेशाची गोवा सरकारकडून अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे या बांधकामात स्थानिक भाजपा सरकारचे हीत दडले आहे की काय असा संशय घेण्यास भरपूर वाव आहे, असा आरोप गोवा तृणमूल काँग्रेसचे नेते समील वळवईकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली होती. जुने गोवे येथील संरक्षित वारसास्थळ असलेल्या सेंट केजिटन चर्च परिसरात हे बेकायदेशीर बांधकाम आहे. अगोदर या ठिकाणी केवळ 50 मीटचे नारळ ठेवण्यासाठी लॉज होते, त्याचेच आता दोन मजली बंगल्यात बेकायदेशीरपणे रुपांतर करण्यात आले आहे. भारतीय परातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने हे बांधकाम बेकायदेशीर ठरवून पाडण्याचा आदेश दिलेला असतानाही, राज्य सरकार ते का पाडत नाही, असा सवाल वळवईकर यांनी केला आहे.
वळवईकर म्हणाले की, जुने गोवेला युनेस्कोने संरक्षितस्थळ म्हणून जाहीर केले आहे. या बेकायदेशीर बांधकामाला सर्व संबंधित सरकारी खात्यांनी एनओसी रद्द करुनही राज्यातील भाजप सरकार हे बांधकाम अजूनही पाडत नाही. यावरुन भाजपच्या काही नेत्यांचा स्वार्थ जपण्याचा कसा प्रयत्न होत आहे हे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात शंभर टक्के राजकीय सहभाग आहे. जोपर्यंत हे बेकायदेशीर बांधकाम पाडले जात नाही, तोपर्यंत लढा सुरुच ठेवला जाईल.