अल-अक्सा मशीद परिसराचा केला दौरा ः
@वृत्तसंस्था / जेरूसलेम
इस्रायलचे उजव्या विचारसरणीचे नेते आणि सुरक्षामंत्री इतामार बेन-गविर यांनी जेरूसलेममधील अल-अक्सा मशिद परिसराचा दौरा केला आहे. इस्रायलच्या मंत्र्याच्या या दौऱयाची सौदी अरेबिया, जॉर्डन, पॅलेस्टाइन आणि संयुक्त अरब अमिरातने कठोर निंदा केली आहे. अल-अक्सा मशिद हे इस्लामधर्मीयांसाठी पवित्र स्थळ मानले जाते. या ठिकाणावरून ज्यू आणि मुस्लिमांदरम्यान दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. दोन्ही समुदायाचे लोक या ठिकाणाला धार्मिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण मानतात.
इस्रायलच्या मंत्र्याच्या या दौऱयावरून अनेक इस्लामिक देशांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. सौदी अरेबिया इस्रायलच्या मंत्र्यांच्या अल-अक्सा मशिद परिसराच्या दौऱयाची निंदा करत आहे. इस्रायलच्या मंत्र्याचे हे पाऊल शांततेचा प्रयत्न आणि धार्मिक पावित्र्याचा सन्मान करण्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय मापदंडांचे उल्लंघन करणारे असल्याचे सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
सौदी अरेबिया पॅलेस्टिनी नागरिकांसोबत ठामपणे उभा असल्याचे त्याच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच पॅलेस्टाइनच्या स्वातंत्र्याची मागणी आणि न्यायपूर्ण तसेच व्यापक तोडग्याचे सौदी अरेबियाने समर्थन केले आहे. याच्या अंर्तत पॅलेस्टिनी नागरिकांना 1967 च्या सीमांनुसार एक स्वतंत्र देश स्थापन करण्याची अनुमती मिळावी आणि पूर्व जेरूसलेमला राजधानीचा दर्जा देता द्यावा असे सौदी अरेबियाने सुचविले आहे.
युएईकडूनही निंदा
इस्रायलच्या मंत्र्याने मशिदीच्या परिसरात प्रवेश केल्याने संयुक्त अरब अमिरातने देखील संताप व्यक्त केला आहे. अल-अक्सा मशिदीची पूर्ण सुरक्षा आणि तेथे होणाऱया उल्लंघनाचा मुद्दा युएईने इस्रायलसमोर उपस्थित केला आहे. जेरूसलेम क्षेत्रात तणाव वाढून अस्थिरता फैलावेल अशाप्रकारचे कुठलेही पाऊल उचलू नका असे आवाहन युएईने इस्रायलच्या अधिकाऱयांना केले आहे. तसेच युएईने मध्यपूर्व क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या आणि अवैध कृत्यांना समाप्त करण्याच्या क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना समर्थन दर्शविले आहे.
जॉर्डनकडूनही प्रतिक्रिया
अल-अक्सा मशिदीतील इस्रायलचे मंत्री बेन-गविर यांच्या दौऱयाची जॉर्डननेही कठोर शब्दांत निंदा केली आहे. अल-अक्सा मशिदीत मंत्र्याचा प्रवेश आणि याच्या पावित्र्याच्या उल्लंघनाची कठोर शब्दात जॉर्डन निंदा करत असल्याचे त्याच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच जॉर्डनने इस्रायलच्या राजदूताला पाचारण करत स्वतःची भूमिका मांडली आहे.
मंत्र्याचा दौरा चिथावणी देणारा ः तुर्किये
तुर्कियेच्या विदेश मंत्रालयाने देखील इस्रायलच्या मंत्र्यांच्या कृत्याची निंदा केली आहे. इस्रायलच्या पोलिसांच्या संरक्षणात अल-अक्सा मशिदीत राष्ट्रीय सुरक्षामंत्री बेन-गविर यांच्या चिथावणीपूर्ण दौऱयाने चिंता निर्माण झाली असल्याचे तुर्कियेच्या विदेश मंत्रालयाने नमूद पेल आहे.
पॅलेस्टाइनही आक्रमक
बेन-गविर यांच्या मशिदीतील दौऱयामुळे हिंसेत वृद्धी होण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या मंत्र्यांचा हा दौरा मशिदीला ज्यू मंदिरात बदलण्याचा एक प्रयत्न असल्याचा आरोप पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद शतयेह यांनी केला आहे. इस्रायलच्या मंत्र्यांचा हा दौरा एका मोठय़ा संघर्षाला जन्म देणारा असल्याचे उद्गार हमासच्या प्रवक्त्याने काढले आहेत. गाझावर हमासचे नियंत्रण असून इस्रायलसोबत या संघटनेचा हिंसक संघर्ष सातत्याने सुरू असतो.
बेन-गविर कोण? इतामार बेन-गविर हे ज्यूइस पॉवर पार्टीचे अत्यंत जहाल राष्ट्रवादी नेते आहेत. ज्यूइस पॉवर पार्टी ही पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ आघाडीत सामील आहे. एक आठवडय़ापूर्वी नेतान्याहू यांनी नवे सरकार स्थापन केले आहे. बेन-गविर यांनी मागील आठवडय़ातच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. टेंपल माउंट सर्वांसाठी खुले आहे. धमकी देऊन मला घाबरविता येईल असा हमासचा विचार आहे, परंतु आता काळ बदलला आहे. इस्रायलचे सरकार आत्मसमर्पण करणार नसल्याचे बेन-गविर यांनी ट्विट करत म्हटले आहे