शुक्रयान अभियानासाठी जोरदार प्रयत्न, अधिक आव्हानात्मक परिस्थिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चांद्रयान-3 हे अभियान यशस्वीरित्या साकारल्यानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रयान अभियानासाठी सज्जता चालविली आहे. चांद्रअभियानापेक्षा हे कार्य अधिक आव्हानात्मक असल्याने सर्व यंत्रणा अचूकपणे निर्माण करण्यासाठी संस्थेचे जोरदार प्रयत्न होत आहेत, अशी माहिती आहे.
या शुक्र अभियानाची सज्जता करण्यासाठी संस्थेला आणखी सहा ते सात वर्षे लागणार आहेत. त्यामुळे हे अभियान 2029 ते 2030 या काळात हाती घेण्यात येणार आहे. शुक्र हा ढगांनी आच्छादलेला ग्रह असून तो तेजस्वी ताऱ्याप्रमाणे भासतो. त्यामुळे अनेकदा त्याचा उल्लेख शुक्रतारा असा केला जातो. शुक्र ते पृथ्वी यांच्यातील अंतरही चंद्राच्या तुलनेत बरेच जास्त आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
पृथ्वीचा जुळा बंधू
शुक्राला पृथ्वीचा जुळा बंधू मानण्यात येते. हा ग्रह वास्तविक एक वायूंचा गोळा आहे. पृथ्वीवर जशी जलवृष्टी होते तशी शुक्रावर आम्लवृष्टी होते. त्यामुळे तेथे सजीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. मात्र, शुक्राभोवती पृथ्वीप्रमाणे वायुमंडल आहे. याचे वातावरण अत्यंत घन आहे. ते पृथ्वीप्रमाणे विरळ नाही. त्यामुळे अंतराळातून या ग्रहाच्या पृष्ठभागाचे दर्शन होत नाही. शुक्राचा वातावरणीय दाब पृथ्वीच्या वातावरणीय दाबाच्या तुलनेत 100 पट जास्त आहे. या ग्रहाचा पृष्ठभाग पृथ्वीवरच्या भूमीसारखा घट्ट आहे की नाही, हे येथून सांगता येत नाही, अशी महत्वपूर्ण माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.
रहस्यमय ग्रह
शुक्राचा पृष्ठभाग दिसत नसल्याने तो रहस्यमय ग्रह मानला जातो. त्याच्या घनदाट वातावरणाखाली नेमकी कोणती रहस्ये दडलेली आहेत याचा शोध घेण्यासाठीच हे अभियान साकारले जात आहे. प्रथम शुक्राभोवती प्रदक्षिणा करणारे यान सोडण्यात येईल, जे शुक्राभोवती परिभ्रमण करुन त्याची जवळून छायाचित्रे पाठविणार आहे. या छायाचित्रांवरुन त्या ग्रहाच्या परिस्थितीची अधिक चांगल्याप्रकारे कल्पना येणार आहे. त्यानंतर त्या ग्रहावर शुक्रवाहन आणि शुक्रबग्गी उतरविण्यासंबंधी योजना करण्यात येईल, असे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
तप्त ग्रह
शुक्र हा तापलेला ग्रह आहे. त्याचा पृष्ठभाग पृथ्वीप्रमाणे थंड नाही. त्याच्या पृष्ठभागावरील तापमान 575 डीग्री सेल्सिअस इतके आहे. त्यामुळे तेथे पृथ्वीवरील निकषानुसार जीवसृष्टी तग धरु शकत नाही. तसेच तेथे अवतरण वाहन (लँडर) तसेच बग्गी किंवा रोव्हर उतरविणेही आव्हानात्मक आहे. कारण एवढ्या अधिक तापमानात तग धरु शकेल आणि कार्य करु शकेल अशी साधनसामग्री आधी निर्माण करावी लागणार आहे, अशी माहिती नेहरु तारामंडलाचे संशोधक बालचंद्रन यांनी दिली. ही आव्हाने पार करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे.
अनेक अभियाने रांगेत…
चांद्र अभियान यशस्वी झाल्याने इस्रोचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येत्या 10 वर्षांमध्ये आणि त्यानंतरही अनेक अवकाश अभियाने हाती घेण्यात येणार आहेत. त्यांपैकी सूर्ययान अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून हे यान सूर्याजवळ एल वन कक्षेत जाण्यासाठी सज्ज आहे. त्यानंतर, गगनयान अभियान हाती घेण्यात येईल. नासाप्रमाणे अंतराळ स्थानक निर्माण करण्याचीही योजना संस्थेची असल्याचे नेहरु तारामंडल तज्ञ प्रेरणा चंद्रा यांनी स्पष्ट केले. एकंदर, अंतराळ संशोधन क्षेत्रात ‘महासत्ता’ होण्याचे हे प्रयत्न आहेत. इस्रोचे सर्व संशोधक आणि काही खासगी संस्थाही ही आव्हाने स्वीकारत आहेत.
चांद्र अभियानानंतर आणखी आव्हाने…
ड चांद्रअभियानापेक्षाही अवघड अशी आव्हाने स्वीकारण्यास इस्रो सज्ज
ड शुक्रावर तापमान बरेच अधिक असल्याने अधिक सज्जता आवश्यक
ड आणखी सहा ते सात वर्षांनी शुक्रअभियान साकारण्यासाठी सज्जता