आपल्याला मोठे आयुष्य लाभावे आणि आपण सदा तरुण असावे, ही प्रत्येकाची इच्छा असणे स्वाभविक आहे. चिरतारुण्य आणि अमरत्व या संकल्पनांनी पुरातन काळापासून माणूस भारुन गेलेला आहे आणि ही ध्येये साध्य करण्यासाठी तो अनेक बरेवाईट उपाय करत असतो. शास्त्रीय संशोधकही माणसाचे आयुष्य वाढावे म्हणून अनेक शतकांपासून प्रयत्नशील आहेत. अमरत्व आणि चिरतारुण्य मिळविण्यासाठी कित्येकजण अघोरी उपायही करतात असे दिसून येते.
असे उपाय करणाऱ्यांमध्ये सुशिक्षित आणि उच्चशिक्षितही मागे नाहीत. कॅलिफोर्नियातील 45 वर्षांचे ब्रायन जॉन्सन हे विख्यात ‘टेकगुरु’ आहेत. त्यांनाही चिरतारुण्याच्या संकपनेने पछाडले आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी अशी घोषणा केली चिरतरुण राहण्यासाठी त्यांनी त्यांचा 17 वर्षीय पुत्र टेल्मेज याचे रक्त स्वत:च्या शरीरात घालून घेणार आहेत. इतकेच नव्हे, तर स्वत:च्या 70 वर्षीय पित्याच्या शरीरातही ते आपल्या मुलाचे रक्त घालणार आहेत. नुसते म्हणून ते थांबले नाही. तर खरोखरच दोन महिन्यांपूर्वी त्यांनी टेल्मेजचा रक्तद्रव स्वत:च्या शरिरात चढवून घेतला. तथापि, त्यांचा हा प्रयोग त्यांच्याच अंगलट आला. कारण त्यांच्या शरिरात तरुण रक्त जाऊनही कोणताही लाभ झाला नाही. ते अधिक तरुण झालेच नाहीत. त्यामुळे निराशाग्रस्त होऊन त्यांनी प्रयोग थांबविला आहे. अनेक डॉक्टरांनी यावर मते व्यक्त केली आहेत. आजारी किंवा रक्त कमी झालेल्या माणसाला रक्त दिल्यास त्याला लाभ होतो. पण ज्याची प्रकृती ठणठणीत आहे, अशा प्रौढ वयाच्या व्यक्तीला तरुणाचे रक्त दिल्याने अशा व्यक्तीचे तारुण्य परत येत नाही. कारण तारुण्य केवळ रक्ताच्या ताजेपणावर अवलंबून नसते. तेव्हा असले प्रयोग कोणीही करु नयेत असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.