पुणे / वार्ताहर :
एका विद्यार्थीनीवर तीन वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका शाळेत समुपदेशन सुरू असताना विद्यार्थीनीने आपल्या शिक्षकांना यासंदर्भात माहिती दिली.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात मुन्ना नदाफ व इतर दोन (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) आरोपींवर बलात्काराचा व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार सन 2018 ते 2019 यादरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सन 2018 ते 2019 यादरम्यान सातवीमध्ये असताना तिच्या घराशेजारी असलेल्या गल्लीत खेळत होती. त्यावेळी एका घराच्या खिडकीतून काहीतरी वस्तू पडली. ती वस्तू देण्यासाठी पीडित मुलगी त्या घरात गेली. त्यावेळी त्या घरात असणाऱ्या मुन्ना नदाफ व इतर दोघांनी मुलीला घरात ओढून दरवाजा बंद केला. त्यानंतर आळीपाळीने तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. तसेच याप्रकरणी कुठेही वाच्यता केल्यास तुला व तुझ्या कुटुंबियांना मारुन टाकेन, अशी धमकी दिली. मात्र, शाळेत समुपदेशन सुरु असताना तिने याबाबत शाळेच्या शिक्षकांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार समोर आला. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.