नागरिकांनी सदुपयोग करून घेण्याचे आवाहन : आमदार प्रकाश हुक्केरी, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुखांच्या कार्याचे कौतुक
बेळगाव : नागरिकांना आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. तरीदेखील समस्यांचे निवारण होत नाही. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठीच स्थानिक पातळीवरच समस्यांचे निवारण व्हावे, याकरिता जनता दर्शन आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केले. येथील केपीटीसीएल भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजू सेठ होते. हुक्केरी म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडविण्यात जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील, नुकताच बदली झालेले जिल्हा पोलीसप्रमुख संजीव पाटील यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. असे असले तरी अनेक अधिकाऱ्यांकडून समस्यांची दखल घेतली जात नाही. नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण व्हावे, त्यांना न्याय मिळावा, सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला मिळावा या उद्देशानेच जनता दर्शन कार्यक्रम भरविला जात आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी जनता दर्शन कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या समस्यांचे त्याच ठिकाणी निवारण करून घ्यावे, भविष्यात प्रत्येक महिन्यात तालुकानिहाय जनता दर्शन कार्यक्रम भरविला जाणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यास मुभा मिळणार आहे. त्यांचे निवारण करण्यासही त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आमदार राजू सेठ यांनी नमूद केले.
जिल्हा प्रशासनाकडून नेहमी पुढाकार
जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नेहमीच पुढाकार घेण्यात आला आहे. असे असले तरी राज्य सरकारकडून नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जनता दर्शनच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. जिल्हा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याला तर प्रत्येक 15 दिवसाला तालुकास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जनता दर्शन कार्यक्रम भरविला जाईल. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून स्थानिक पातळीवरील तक्रारी त्याच ठिकाणी मिटविल्या जातील. राज्यस्तरावर असणाऱ्या समस्यांचे अर्ज सरकारकडे पाठविले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी बसवराज हेग्गनायक, डीसीपी रोहन जगदीश, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला आदी उपस्थित होते.