विविध खात्यांची पूर्वतयारी बैठक : त्वरित तक्रार निवारणाचा होणार प्रयत्न
बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नेहरूनगर येथील केपीटीसीएल सभागृहात जिल्हा पातळीवरील जनता दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. जनता दर्शन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांसमवेत जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधीही या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी आयपीजीआरएस पोर्टलमध्ये अपलोड करून मुदतीत त्या तक्रारींचे निवारण करावे लागणार आहे. जनता दर्शन कार्यक्रमात सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, सल्ला आदींवर जागेवरच निर्णय घेतला जाणार आहे. अधिकाऱ्यांनी या तक्रारी लक्षपूर्वक ऐकाव्यात. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून जनता दर्शन कार्यक्रम होत आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने गांभीर्याने आपला सहभाग दाखवावा.
जनता दर्शनात भाग घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विविध खात्यांच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. आरोग्य, कृषी, बागायत, कामगार, समाजकल्याणसह विविध खात्यांच्या योजना पोहोचविण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी यासाठी आवश्यक तयारी करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले, सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. केपीटीसीएल सभागृहात जनता दर्शनासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्यासाठी आठ काऊंटर उघडले आहेत. अर्ज स्वीकारल्यानंतर त्वरित आयपीजीआरएस पोर्टलमध्ये नोंदणी करण्यात येणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, पोलीस उपअधीक्षक विरेश दोडमनी, सदाशिव कट्टीमनी, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.