जिल्हा पातळीवर आयोजन : नागरिकांना गाऱ्हाणे मांडण्याचे आवाहन, तक्रारींचा होणार निपटारा
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेवरून आता जिल्हा पातळीवरही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दर्शन कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मंगळवार दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नेहरूनगर येथील केपीटीसीएल भवन येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत जनता दर्शन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जनता दर्शनाच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेंगळूर येथे जनता दर्शन कार्यक्रम घेतात. गाऱ्हाणे मांडण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील नागरिक बेंगळूरला पोहोचत आहेत. ही कामे जिल्हा पातळीवरच झाली तर सर्वसामान्य नागरिकांचे बेंगळूरला येण्याचे त्रास वाचणार आहेत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा पातळीवरही जनता दर्शन भरविण्याची सूचना केली आहे.
पालकमंत्री व इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवारी जनता दर्शन होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात आपले गाऱ्हाणे मांडावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. दर महिन्याला जिल्हा पातळीवर जनता दर्शन कार्यक्रम होणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जनता दर्शनमध्ये येणाऱ्या तक्रारींची जागेवरच दखल घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक खात्याच्या जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावणे सक्तीचे आहे. जनता दर्शन कार्यक्रमात येणारे अर्ज लवकरात लवकर निकालात काढावेत. संबंधितांना याविषयीची माहितीही द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सार्वजनिक तक्रार निवारण व्यवस्था (आयपीजीआरएस) पोर्टलमध्ये नागरिकांकडून येणाऱ्या अर्जांची नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवर अर्ज स्वीकारल्यासंबंधीची माहिती पोहोचते. तसेच या तक्रारींची नियोजित वेळेत निवारण करण्याची गरज आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर समस्या निवारणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या बैठकीत अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख वेणूगोपाल, पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.