दुखापतीनंतर प्रणॉयचे पुनरागमन : श्रीकांत, सेनचा समावेश
वृत्तसंस्था/ कुमामोटो (जपान)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2023 च्या बॅडमिंटन हंगामातील जपान मास्टर्स सुपर 500 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत एच. एस. प्रणॉय, किदांबी श्रीकांत आणि लक्ष सेन भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. दुखापतीच्या समस्येनंतर प्रणॉयचे या स्पर्धेत पुनरागमन होत आहे. श्रीकांत आणि सेन हे विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक मिळविल्यानंतर प्रणॉयला पाठ दुखापतीच्या समस्येमुळे अनेक स्पर्धांना मुकावे लागले होते. तो बरेच दिवस बॅडमिंटन क्षेत्रापासून अलिप्त राहिला होता. ही दुखापत आता बरी झाली असल्याने प्रणॉयचे बॅडमिंटन क्षेत्रात पुनरागमन होत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या हाँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तब्बल 41 वर्षांनंतर पुरूष एकेरी पहिले पदक मिळविण्याची संधी मिळाली होती आणि 31 वर्षीय प्रणॉयने कांस्यपदक पटकाविले होते. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या जपान मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयचा सलामीचा सामना हाँगकाँगच्या बिगर मानांकित ली युई बरोबर होणार आहे. भारताचे बॅडमिंटनपटू लक्ष सेन आणि किदांबी श्रीकांत यांना पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी मानांकन गुण मिळविण्याची संधी या स्पर्धेद्वारे उपलब्ध झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीचा कालावधी 1 मेपासून सुरू झाला असून तो पुढील वर्षीच्या 28 एप्रिलपर्यंत राहणार आहे. गेल्या जुलै महिन्यात झालेल्या कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर लक्ष्य सेनला त्यानंतरच्या शेवटच्या चार स्पर्धांमध्ये पहिली फेरी पार करता आलेली नाही. जपानमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेत लक्ष सेनचा सलामीचा सामना जपानच्या पाचव्या मानांकित नाराओकाशी होणार आहे. भारताचा आणखी एक बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याचा या स्पर्धेतील सलामीचा सामना पात्र फेरीतील विजयी खेळाडूशी होणार आहे. तर प्रियांशु राजवतचा पहिल्या फेरीचा सामना चीन तैपेईच्या लीन चुनशी होणार आहे. या स्पर्धेमध्ये महिलांच्या विभागात भारताची पीव्ही सिंधू ही एकमेव बॅडमिंटनपटू सहभागी होत आहे. तिचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या बिगर मानांकित मिया ब्लिचफेल्टशी होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना दुहेरीच्या मानांकनात अग्रस्थान देण्यात आले आहे.