चीनची उडविणार झोप
वृत्तसंस्था/ ब्युनॉस आयर्स
अर्जेंटीनातील उजव्या विचारसरणीचे नेते जेवियर माइली हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. अर्जेंटीनाच्या जनतेने प्रचंड महागाई, आर्थिक मंदी आणि वाढत्या गरीबीला सामोरे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी जहाल विचारसरणीच्या नेत्याची निवड केली आहे.
माइली यांना या निवडणुकीत सुमारे 56 टक्के तर विरोधी उमेदवार सर्जियो मस्सा यांना 44 टक्के मते प्राप्त झाली आहेत. तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचा सर्वेक्षकांचा अनुमान खोटा ठरला आहे. 1983 मध्ये अर्जेंटीना लोकशाहीच्या पुनरागमानंतरचा हा सर्वात मोठा विजय असल्याचे बोले जात आहे.
अर्जेंटीना सध्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. जेवियर यांनी या निवडणुकीतील प्रचारावेळी लोकांना आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवून देण्याची घोषणा केली होती. अर्जेंटीनाच्या मध्यवर्ती बँकेचे अस्तित्व संपुष्टात आणत नवी व्यवस्था लागू करण्याचे आश्वासन जेवियर यांनी देशवासीयांना दिले आहे.
लोकांकडून जल्लोष
निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यावर अर्जेंटीनाची राजधानी ब्युनॉस आयर्सच्या रस्त्यांवर लोकांनी स्वत:च्या वाहनांची हॉर्न वाजवून आनंद व्यक्त केला. तर जल्लोष करण्यासाठी हजारो लोक रस्त्यांवर उतरले. माइली यांच्या विजयासोबतच अर्जेंटीनाचा ओढा आता उजव्या विचारसरणीकडे असणार आहे. माइली यांनी स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात टीव्हीवर निवेदक म्हणून केली होती. अर्जेंटीनामध्ये सध्या महागाई दर 140 टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. वाढत्या महागाईमुळे देशातील गरीबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जेवियर यांनी महागाईवर नियंत्रण मिळविण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.
चीन-ब्राझीलचे टीकाकार
अर्जेंटीनाचे भावी अध्यक्ष जेवियर माइली यांना चीनविरोधक मानले जाते. चीनसोबत ते ब्राझीलवरही सडकून टीका करत असतात. कुठल्याही कम्युनिस्ट देशासोबत कोणत्याही प्रकारचा करार करणार नसल्याचे जेवियर यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तर दुसरीकडे जेवियर हे अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यावर ब्राझीचे अध्यक्ष लूला सिल्वा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सर्जियो मस्सा यांनी स्वत:चा पराभव मान्य करत जेवियर यांना देशाचा आगामी अध्यक्ष होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कटर अन् जेवियर
जेवियर माइली हे स्वत:च्या अनोख्या शैलीसाठी देखील अत्यंत लोकप्रिय राहिले आहेत. त्यांना प्रचारसभांमध्ये एका कटरसोबत पाहिले जात होते. स्वत:सोबत कटर आणण्याचे त्यांचे कृत्य हे करांमधील कपातीच्या आश्वासनांचे प्रतीक म्हणून ओळखले गेले. परंतु काही काळानंतर त्यांनी स्वत:सोबत कटर बाळगणे बंद केले होते. जेवियर यांना स्वत:च्या उदारमतवादी प्रतिमेला धक्का पोहोचण्याची भीती सतावू लागली होती. याचमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता.