सावंतवाडी : प्रतिनिधी
न्यायालयाची पोलिसांना चपराक
सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बरेगार यांनी सावंतवाडी वनविभागातील बनावट पासप्रकरणी तत्कालीन वनपाल सुनील सावंत यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. याबाबत एक वर्ष होऊ नये गुन्हा दाखल न झाल्याने बरेगार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. रितसर नोटीस देऊन ते उपोषणाला बसले होते. मात्र, रितसर नोटीस देऊनही बरेगार यांच्यावरच भादंवि कलम १८८ व १८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा किरकोळ गुन्ह्यात गुन्हा कबूल केल्यास दंड भरावा लागतो. मात्र, असा प्रसंग अन्य कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यावर येऊ नये, यासाठी बरेगार यांनी न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले. अतिरिक्त न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात सदर संक्षिप्त खटला चालून त्यात बरेगार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
न्यायालयाने निकालात नमूद केले की, आरोपीला भादंवि कलम १४९ प्रमाणे नोटीस दिल्याचे दिसून येत नाही त्यामुळे नोटीसीची अवज्ञा केल्याचे दिसून येत नाही. कलम १९५ अन्वये प्रस्तुत न्यायालय आयपीसी कलम १७२ ते १८८ नुसार या गुन्ह्याची दखल घेऊ शकत नाही. जोपर्यंत लेखी तक्रार शासकीय अधिकारी न्यायालयात करत नाहीत. याचाच अर्थ प्रस्तुत खटल्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याची लेखी तक्रार न्यायदंडाधिकारी यांच्याकडे करणे पोलिसांना बंधनकारक होते. परंतु तसे प्रस्तुत खटल्यात झालेले नाही. साक्षीदार क्रमांक एक पावसकर यांनी दाखल केलेली प्रथम खबर भादंवि कलम १९५ अन्वये या न्यायालयाला विचारात घेता येणार नाही. या प्रकरणात बरेगार यांच्यातर्फे वकील संदीप निंबाळकर यांनी काम पाहिले.