वृत्तसंस्था/ ग्वाडालाजारा, मेक्सिको
येथे सुरू झालेल्या ग्वाडालाजारा ओपन डब्ल्यूटीए 1000 टेनिस स्पर्धेत महिलांमधील जागतिक अग्रमानांकित ट्युनिशियाची ऑन्स जेबॉर, कॅरोलिन गार्सिया, मारिया सॅकेरी, एम्मा नॅव्हारो, व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी विजयी सुरुवात केली. मॅडिसन कीज, सॅस्नोविच यांचे आव्हान संपुष्टात आले.
अग्रमानांकित जेबॉरने अमेरिकेच्या अॅलिसिया पार्क्सचा 6-2, 6-2 असा पराभव करीत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. पहिल्या फेरीत तिला बाय मिळाला होता. तिने हा सामना केवळ 59 मिनिटांत संपवला. या स्पर्धेत ती पहिल्यांदाच खेळत आहे. तिची पुढील लढत मार्टिना ट्रेव्हिसनशी होईल. तिसऱ्या मानांकित फ्रान्सच्या कॅरोलिना गार्सियाने बेलारुसच्या अॅलियाक्सांड्रा सॅस्नोविचचा 4-6, 7-6 (5), 6-4 असा तीन सेट्सच्या लढतीत पराभव करीत तिसरी फेरी गाठली. तिची पुढील लढत अमेरिकेच्या हेली बॅप्टिस्टशी होईल. बॅप्टिस्टने 16 व्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हावर विजय मिळविला. पहिल्या आठ मानांकित खेळाडूंना पहिल्या फेरीत बाय देण्यात आला होता.
अन्य एका सामन्यात माजी अग्रमानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने डायाना यास्त्रsम्स्कावर 6-4, 7-6 (7-5) अशी मात करीत आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित मारिया सॅकेरीनेही या स्पर्धेत पुनरागमन करताना स्टॉर्म हंटरचा 6-2, 6-4 असा पराभव केला. तिची पुढील लढत कॅमिला जॉर्जीशी होईल. एम्मा नॅव्हारोने चौथ्या मानांकित अमेरिकेच्या मॅडिसन कीजचे आव्हान 6-2, 7-6 (7-5) असे संपुष्टात आणत तिसरी फेरी गाठली. 22 वर्षीय नॅव्हारोने गेल्या आठपैकी सात सामने जिंकले आहेत. लैला फर्नांडेझ ही तिची पुढील प्रतिस्पर्धी असेल.