चिंबलचा आयआरबी पोलीस निलंबित ; मृतदेह न स्वीकारण्यावर कुटुंबीय ठाम,अपघात नव्हे, खूनच केल्याचा दावा
पणजी ; चिंबल येथील जयेश चोडणकर याचा अपघाती मृत्यू झाला नसून त्याचा खूनच करण्यात आला आहे, असा जयेशच्या कुटुंबियांनी केलेला दावा काल सोमवारी पाचव्या दिवशीही कायम ठेवला आणि मृतदेह ताब्यात घेतला नाही. दरम्यान या प्रकरणातील एक संशयित असलेल्या, प्रीतेश हडकोणकर या चिंबल येथे राहणाऱ्या आयआरबी पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. संशयितांच्या विरोधात नोंद केलेल्या तक्रारीत खुनाचे कलम जोडून त्या दिशेने तपास करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी जयेशच्या कुटुंबियांनी घटनेच्या पहिल्या दिवसापासून लावून धरली आहे. पोलिसांनी हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंद केलेले आहे.
जयेशच्या अंगावर, डोक्यावर वार
जयेशच्या शवचिकित्सा अहवालात त्याच्यावर दंडुक्यानी वार केल्याचे स्पष्ट म्हटले आहे. तसेच त्याच्या डोक्यावरही वर करण्यात आले आहेत. ज्या वाहनाची जयेशला धडक बसली होती ते वाहनही अद्याप पोलिसांनी ताब्यात का घेतले नाही, असा थेट प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.
संशयितांकडून घटनेची कबुली
चिबंल जंक्शनवर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात जयेश चोडणकर याला कृपेश वळवईकर (बिठ्ठोण) व प्रीतेश हडकोणकर (चिंबल) यांनी जबर मारहाण केली होती. नंतर त्याला जिवे मारण्यासाठी सळई काढल्याने जयेश जीव वाचविण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी त्याला एका वाहनाची धडक बसली. दोन्ही संशयित जयेशला मारण्यासाठी पाठलाग करीत होते, असे आता खुद्द संशयितांनीच जबानीत कबूल केले आहे.
ते वाहन जप्त का नाही केले?
ज्या वाहनाने जयेशला धडक दिली होती, ते वाहन संशdियातांचेच असण्याची शक्यता जयेशच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे. ते वाहन पोलिसांनी अद्याप का जप्त केले नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
नियोजितपणे खून केल्याचा दावा
जयेश चोडणकर याचा नियोजितपणे खून केल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. ओल्ड गोवा पोलिसांनी या प्रकरणातील संशयित कृपेश वळवईकर व प्रीतेश हडकोणकर या दोघानांही अटक केली आहे. त्यांच्या विरोधात भादंसंच्या 504, 506 (2), 365 व 324 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.