वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियात होणाऱया महिलांच्या आठव्या बिग बॅश लिग क्रिकेट स्पर्धेसाठी भारताची धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रीग्ज बरोबर मेलबर्न स्टार्सने नवा करार नुकताच केला आहे.
22 वर्षीय जेमिमा रॉड्रीग्जने गेल्या बिग बॅश महिलांच्या टी-20 लिग हंगामात मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. या संघाकडून खेळताना तिने एकूण 333 धावा जमविल्या होत्या. मुंबईत जन्मलेली जेमिमा मेलबर्न स्टार्स क्लबकडून खेळणारी भारताची पहिली महिला क्रिकेटपटू आहे. 2022 च्या बिग बॅश लिग हंगामासाठी आता भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मेलबर्न रेनेगेड्स तसेच पूजा वस्त्रकार ब्रिस्बेन हिट क्लबकडून खेळणार आहेत. बांगलादेशमध्ये 1 ते 16 ऑक्टोबर दरम्यान महिलांची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जेमिमाचा भारतीय संघात समावेश आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर ती मेलबर्न स्टार्स संघात दाखल होईल.