वृत्तसंस्था/ रांची
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आदिवासी समुदायातील सरना धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना जनगणना कोडमध्ये सामील करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सोरेन यांनी सरना धर्म कोडवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जनगणनेवेळी प्रत्येक व्यक्तीचा एक अर्ज भरून घेतला जातो, यात संबंधिताच्या धर्माचाही उल्लेख करावा लागतो. सरना धर्म मानणाऱ्या लोकांसाठी अर्जात अन्य धर्मांप्रमाणेच सरना धर्मासाठी स्वतंत्र कॉलम तयार करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. सरना धर्माचे लोक निसर्गपूजा करणारे असतात. आदिवासी समुदायाचा एक मोठा हिस्सा सरना धर्माचे पालन करणारा असून झारखंडमध्ये अशा लोकांची संख्या सर्वाधिक आहे. याचबरोबर ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि छत्तीसगडमध्येही हा समुदाय आढळून येतो.