नवी दिल्ली
रिलायन्स जिओने नुकतीच एक महिन्याच्या मोफत चाचणी ऑफरसह नवीन पोस्टपेड फॅमिली प्लॅनची घोषणा केली आहे. ही योजना 399 रुपयांपासून सुरू होते. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेपूर्वी ही योजना सादर करण्यात आली आहे. रिलायन्सच्या विकॉम 18 ने या स्पर्धेचे अधिकार विकत घेतले आहेत आणि ही स्पर्धा जिओ सिनेमा अॅपवर विनामूल्य दाखवण्यात येणार आहे. जिओ प्लस नावाने पोस्टपेड फॅमिली प्लॅन 22 मार्चपासून सर्व जिओ स्टोअर्सवर आणि होम डिलिव्हरी पर्यायाद्वारे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना सिंगल बिल, डाटा शेअरिंग आणि प्रीमियम कंटेंट अॅप सुविधा मिळतील. पोस्टपेड सेगमेंटमध्ये जिओची हळूहळू वाढ झाली आहे आणि ही नवीन ऑफर या मार्केट सेगमेंटमध्ये मोठा वाटा मिळवण्यासाठी प्रयत्न करते आहे. ही नवीन ऑफर प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलला आव्हान देणार आहे. एअरटेलने अलीकडच्या काही महिन्यांत या विभागातील ग्राहकांच्या संख्येत वाढ नोंदवली आहे.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘जिओ प्लस सादर करण्याचा उद्देश पोस्टपेड वापरकर्त्यांना आकर्षक नवीन फायदे आणि अनुभव प्रदान करणे हा आहे.