एक चांगली नोकरी मिळविणे आणि ती निवृत्त होईपर्यंत टिकविणे, यात अनेकांच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते, अशी स्थिती आपल्याला परिचित आहे. ही स्थिती आपल्याच देशात आहे असे नव्हे. जगातल्या जवळपास प्रत्येक देशात असेच आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने लोक व्यवसायापेक्षा नोकरीलाच प्राधान्य देतात.
पण, नोकरी करतानाही चलाखी करणारे काही महाभाग असतात. एकाच वेळी दोन ठिकाणी नोकरी करुन एका ठिकाणी कामाचे आणि एका ठिकाणी बिनकामाचे वेतन घेणाऱ्या चलाखांच्या कथा आपण वृत्तपत्रात वाचलेल्या असतात. पण चीनमध्ये एक महिला अशी आहे, की, तिने एकाचवेळी तब्बल 16 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या. इतकेच नव्हे, तर या सर्व कंपन्यांमधून 3 वर्षांपर्यंत वेतनही घेतले. हे कमी म्हणून की काय, पण एकाचवेळी 16 कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या या अफलातून महिलेने कोठेही काम प्रत्यक्ष केलेच नाही.
अखेरीच चार वर्षांनंतर हा ‘नोकरी घोटाळा’ चव्हाट्यावर आला. नंतर या महिलेला अटक होऊन तिची चौकशी केली जात आहे. तिचा पती फिरतीची नोकरी करत आहे. त्याच्यासह ही महिलाही वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असे आणि तेथे नोकऱ्या करीत असे. मात्र, नवी नोकरी घेताना पूर्वीची सोडत नसे. अशा प्रकारे जवळपास चार वर्षांच्या कालावधीमध्ये ती एकाचवेळी 16 कंपन्यांची कर्मचारी होती. तिने इतका पैसा मिळविला की शांघायसारख्या शहरात घरही घेतले. मात्र, आता तिचे हे गुपित फुटले आहे.