किसन फडते यांचे उद्गार
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
समाजातील गैरप्रवृत्तीवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करीत असतो. तो केवळ बातमीदार नसतो तर समाजाला प्रबोधन करण्याची ताकद त्याच्या लेखणीत असते. त्याने आपल्या लेखणीची धार कायम परजती ठेवावी, असे उद्गार उद्योजक तथा साहित्यिक किसन फडते यांनी काढले.
मराठी पत्रकारितेचे आद्यप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकारदिन म्हणून साजरी केली जाते. गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे संस्थेच्या पणजी येथील सभागृहात आयोजित केलेल्या या पत्रकारदिन सोहळ्यात फडते हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार सुशांत कुंकळ्योकर, सुनील फातर्पेकर व नारायण राठवड यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सुहास बेळेकर व प्रकाश तळवडेकर यांनी सत्कार मूर्तीचा परिचय करून दिला. रमेश वंसकर यांनी स्वागत केले. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार राजू भिकारो नाईक यांनी सूत्रसंचालन तर चित्रा क्षिरसागर यांनी आभार मानले.