शाहूवाडी/प्रतिनिधी
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latake) विजयी झाल्याचे समजताच. शाहूवाडी तालुक्यात ठाकरे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. मूळच्या शाहूवाडी तालुक्यातील ऋतुजा लटके यांच्या विजयने संपूर्ण शाहुवाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
तत्कालीन दिवंगत आमदार रमेश लटके यांचे मूळ गाव हे शाहूवाडी तालुक्यातील धुमकवाडी आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनाने लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून संधी मिळाली. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच त्यांच्याविषयी असलेली राजकीय लढाई चांगलीच चर्चेत आली होती. निकाल जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर ‘शाहूवाडी या ठिकाणी जल्लोष केला.
हे ही वाचा : ठाकरे गटाची मशाल धगधगली; अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी
लटकेंच्या मूळ गावी जल्लोष
ग्रामीण भागातील एक युवक मुंबईसारख्या शहरांमध्ये जाऊन रमेश लटक्यांच्या रूपान आमदार झाला. पण दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. आणि आमचा वाघ हरपला अशी भावना त्यांच्या मूळ धुमकवाडी गावातील नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. आज आमच्या गावची सून आमदार झाली असे म्हणत खऱ्या अर्थाने धुमकवाडीकरांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. एका डोळ्यामध्ये रमेश लटके यांच्या जाण्याचा दुःख ‘ तर दुसऱ्या डोळ्यांमध्ये ऋतुजा लटके यांच्या विजयाचे आनंदाश्रू होते. एकूणच अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांनी मिळवलेला विजय हा शाहूवाडीकरांच्या दृष्टीने आनंददायक असल्याने शाहूवाडी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी आनंद उत्सव साजरा केला जात होता.