साखळीतील घटना. वृध्द महिलेने मारली वाळवंटी नदीत उडी. अग्निशामक दलाकडून जिवनदान
डिचोली : जिवनाचा अंत करण्याच्या विचाराने नदीत उडी मारली खरी पण, जगण्याची किंचित आस असलेल्या एका वृध्देने अखेर नदीतील खडकाचा आधार घेत आपला इरादा बदलला. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर वृध्देला पाण्याबाहेर काढून जिवनदान दिले. पुलावरून उडी मारल्याने तिच्या पायाला मात्र दुखापत झाली. आलेक्सिया लोबो (रा. दत्तवाडी साखळी) असे सदर महिलेचे नाव आहे. सदर प्रकार साखळीत काल बुध. दि. 31 मे रोजी सकाळी 6.30 वा. घडला. एक 65 वर्षीय वृध्द महिलेने आपल्या जिवनाचा अंत करण्याच्या इराद्याने दत्तवाडी येथील पुलावरून थेट वाळवंटी नदीत उडी घेतली. परंतु ती थेट खोल पाण्यात न जाता खडकाळ भागात स्थिरावली. वरून खाली उडी मारूनही वाचल्यानंतर जिवनची आशा ताजी झालेल्या सदर वृध्देने नदीतील एका खडकाचा आधार घेत त्यावर बसून राहिली. या घटनेची माहिती कोणीतरी नियंत्रण कक्ष पणजी येथे दिली. नियंत्रण कक्षाकडून डिचोली अग्निशामक दलाला सकाळी 6.43 वा. माहिती देण्यात आली. हि माहिती मिळताच डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी साखळीत धाव घेतली व नदीत उतरत त्या वृद्ध महिलेला काठावर आणले. या बचावकार्यात डिचोली अग्निशामक दलाच्या विठ्ठल गावकर, विठ्ठल गाड, रूपेश पळ, हर्षद सावंत, गौरेश गावस, विष्णू राणे, अनुप नाईक यांनी सहभाग घेतला.