क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना व एकता युवक मंडळ नवरात्रोत्सव कांगले गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनियर मि. बेळगाव टॉप टेन जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा व मोरया क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा, मोरया श्री टॉप टेन मोरया जिम मर्यादित शरीरसौष्टव स्पर्धेचे आयोजन शनिवार 1 ऑक्टो. रोजी हेमू कलानी चौक, शनी मंदिर बेळगाव येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 55 किलो गट, 60, 65, 70, 75 व 75 किलो वरील अशा सहा गटात घेणार आहेत. या गटातील प्रत्येक पहिल्या पाच विजेत्यांना 2500, 2000, 1500, चौथ्या व पाचवा क्रमांकासाठी प्रत्येकी 1000 रुपये रोख, पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविणार आहे. किताब विजेत्या स्पर्धकाला रोख 5 हजार रुपये, मानाचा किताब, चषक व प्रमाणपत्र तर उत्कृष्ट पोझरला 2000 रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र देवून गौरविणार आहे.
ज्युनियर मि. बेळगाव 21 वर्षाखालील स्पर्धकांसाठी असून, या स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 1500 व चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी 1000 रुपये देण्यात येणार आहे. या गटातील सर्व स्पर्धकांनी दहावीचे प्रमाणपत्र, जन्म दाखला व आधारकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणणे सक्तीचे आहे. सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद स्पर्धकांनी घ्यावी. इच्छुकांनी आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत, गौरांग गेंजी, सतीश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार व एम. के. गुरव यांनी केले आहे.