गृहमंत्र्यांकडून अभिनेत्याचे कौतुक ः तेलगू चित्रपटसृष्टीचे रत्न असा उल्लेख
वृत्तसंस्था/ हैदराबाद
दक्षिणेतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांनी अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची हैदराबादमध्ये भेट घेतली आहे. शाह यांनी एनटीआर यांच्यासोबतची छायाचित्रे ट्विटरवर शेअर करत त्यांना तेलगू चित्रपटसृष्टीचे रत्न संबोधिले आहे. तसेच शाह यांनी एनटीआरला गुणवान कलाकार ठरविले आहे. एनटीआरने या ट्विटर प्रतिक्रिया व्यक्त करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत.
हैदराबादमध्ये तेलगू चित्रपटसृष्टीचे रत्न आणि अत्यंत प्रतिभावान कलाकार ज्युनियर एनटीआरसोबत उत्तम चर्चा झाली असल्याचे शाह यांनी छायाचित्रे शेअर करत म्हटले आहे. तसेच त्यांनी तेलगू भाषेत काही मजकूर लिहून अभिनेत्याला टॅग केले आहे. ज्युनियर एनटीआरने पोस्टला ट्विटरवर री-शेअर करत ‘अमित शाह यांना भेटून आणि त्यांच्याशी उत्तम संभाषण करून अत्यंत आनंद झाला. तुमचे आभार’ असे नमूद केले आहे.
राजकीय पार्श्वभूमी
अमित शाह आणि ज्युनियर एनटीआर यांच्या भेटीवरून अनेक प्रकारचे कयास वर्तविण्यात येत आहेत. भाजप योग्यवेळी तुमच्या सेवांचा उपयोग करणार असल्याचे शाह यांनी एनटीआरला सांगितले असल्याचे समजते. ज्युनियर एनटीआरने 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलगू देसम पक्षासाठी सक्रीय स्वरुपात प्रचार केला होता. परंतु त्यानंतर त्याने राजकारणापासून अंतर राखले होते.
भाजपच्या नेत्यांना नव्हती कल्पना
केंद्रीय गृहमंत्री आणि अभिनेत्याच्या या भेटीबद्दल अखेरच्या क्षणापर्यंत कुणालाच कल्पना नव्हती. राज्यातील पक्षाच्या नेत्यांना या बैठकीबद्दल माहिती नव्हती. अमित शाह यांनी आरआरआरमध्ये ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाने प्रभावित भेटीसाठी निमंत्रित केले होते. परंतु चित्रपटासाठी अभिनंदन करायचे होते तर रामचरण यांनाही सोबत बोलवणे अपेक्षित होते असे म्हणत या भेटीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
1200 कोटींची कमाई
ज्युनियर एनटीआर हे राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसून आले होते. हा चित्रपट एका काल्पनिक कहाणीवर आधारित होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाची एकूण कमाई 1200 कोटी रुपयांहून अधिक राहिली होती. आलिया भट्ट आणि अजय देवगणने देखील या चित्रपटात काम केले आहे.