वृत्तसंस्था/ हांगझोयु
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारात महिलांच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा व्हेनामने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाच्या तिरंदाजपटूंना मागे टाकत पात्र फेरीमध्ये आघाडीचे स्थान (पोल पोझीशन) मिळवले आहे. तर भारताची विश्वविजेती आदिती स्वामी चौथ्या स्थानावर आहे.
अलीकडच्या कालावधीत तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष आणि महिला तिरंदाजपटुंची कामगिरी सातत्याने दर्जेदार होत असून पुढील वर्षी होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत या क्रीडा प्रकारात भारतीय तिरंदाजपटुंकडून पदकांची अपेक्षा निश्चित बाळगली जात आहे. तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकारात भारतीय महिला तिरंदाजपटूंनी आपले वर्चस्व ठेवले आहे. पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात भारताचा अतेनु दास पात्र फेरीमध्ये चौथ्या स्थानावर असून धीरज भोमदेवरा सहाव्या स्थानावर आहे. तथापि भारताच्या पुरुष तिरंदाज संघाने रिकर्व्ह प्रकारात 2022 गुणासह आपली पात्रता सिद्ध केली आहे. दरम्यान पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात पात्र फेरीमध्ये द. कोरियाचा संघ 2048 गुणासह पहिल्या स्थानावर असून चीन तैपेई 2030 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे.
विक्रम, कार्तिका चौथ्या, पाचव्या स्थानी
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोलर स्केटींग 1000 मी. स्प्रिंट या प्रकारात पुरुषांच्या विभागात भारताच्या विक्रम इंगळेने चौथे स्थान तर महिलांच्या विभागात कार्तिका जगदेश्वरनने पाचवे स्थान मिळवले आहे. पुरुषांच्या विभागातील अंतिम फेरीमध्ये विक्रम इंगळेचे पदक थोडक्यात हुकले. या प्रकारात भारताच्या घुमनने सातवे स्थान पटकावले. सोमवारी भारतीय स्केटर्स 3000 मी. रिले प्रकारात भाग घेणार आहेत. 2010 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या रोलर स्केटींगपटुंनी दोन कास्यपदके मिळवली होती.
सोनिया देवी अंतिम फेरीत
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कायकिंग सिंगल 500 मी. प्रकारामध्ये भारताच्या पी. सोनियादेवीने अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. पात्र फेरीमध्ये तिने दुसरे स्थान मिळवले. मात्र महिलांच्या कॅनोई सिंगल 200 मी. प्रकारात भारताच्या मेघा प्रदीपला अंतिम फेरीपासून वंचित व्हावे लागले.
आदित्य डी चे आव्हान समाप्त
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 81 किलो कुराश क्रीडा प्रकारात भारताच्या डी. आदित्यचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. रविवारी झालेल्या लढतीत अफगाणच्या एस. हासन रसुलीने आदित्यचा केवळ दोन मिनिटांच्या कालावधीत 10-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले. या क्रीडा प्रकारात महिलांच्या 87 किलो गटात भारताची ज्योती टोकास, पुरुषांच्या 90 किलो वजन गटात यश चौहान यांच्या उपांत्यपुर्व फेरीच्या लढती सोमवारी होत आहेत. या लढतीमध्ये भारतीय स्पर्धकांनी विजय मिळवल्यास त्यांचे किमान एक पदक निश्चित होईल. महिलांच्या 52 किलो वजन गटातील उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत भारताच्या पिंकी बेलहाराला तसेच महिलांच्या 52 किलो गटात भारताच्या सुचिका तेरियाल आणि पुरुषांच्या 66 किलो गटात केशवचे आव्हान संपुष्टात आले आहे.
भारतीय पुरुष, महिला पराभूत
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक सिपेकटेकरॉ या क्रीडा प्रकारात सलामीच्या सामन्यातच भारताच्या पुरुष आणि महिला स्पर्धकांना हार पत्करावी लागली. भारताच्या महिला स्पर्धकांना सलग दोन पराभव स्वीकारावे लागले तर पुरुषांच्या विभागात सलामीच्या लढतीत भारतीय स्पर्धक पराभुत झाले.
महिलांच्या विभागातील पहिल्या लढतीत लाओसने भारताचा 21-14, 21-16 त्यानंतर दुसऱ्या लढतीत चीनने भारताचा 21-15, 21-14 असा पराभव केला. पुरुषांच्या ब गटातील प्राथमिक फेरीच्या लढतीत जपानने भारतावर 21-14, 21-16 अशी मात 50 मिनिटांच्या कालावधीत केली. आता महिला विभागात भारताचा पुढील सामना फिलिपिन्सबरोबर तर पुरुषांच्या विभागात पुढील सामना सिंगापूरबरोबर सोमवारी होत आहे. सिपेकटेकरॉ या क्रीडा प्रकारात भारताने आतापर्यंत एकमेव पदक 2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले होते.