वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमधील कूपरथळा येथे बॉडी बिल्डर कबड्डीपटूचा तलवारीने वार करून खून केला. यानंतर मृतदेह घराबाहेर फेकून देण्यात आला. मारेकऱ्यांनी तरूणाच्या आई-वडिलांसमोरच ही हत्या केली असून हल्लेखोर पसार झाले आहेत. याप्रकरणी वडिलांनी मुख्य आरोपीची ओळख पटवली असली तरी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या हत्या प्रकरणावरूनही राजकारण सुरू झाले असून शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी मृत तरूणाचा फोटो पोस्ट करून भगवंत मान सरकारवर निशाणा साधला आहे.
हरदीप सिंग नामक प्रसिद्ध कबड्डीपटूच्या हत्येची घटना शुक्रवारी रात्री उशिरा ढिलवान पोलीस स्टेशन हद्दीत घडली. हरदीपचे वडील गुरूनाम सिंह यांनीच याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मृत हरदीप सिंग उर्फ दीपा याचा या भागातील हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी याच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच ही हत्या झाल्याचे मानले जात आहे. वादप्रकरणी दीपा आणि हॅप्पी या दोघांविऊद्ध ढिलवण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.