फोंडा : साकरवाळ, तोर्ल-शिरोडा येथे कदंब बसने रस्त्यालगतच्या झाडाला दिलेल्या धडकेत चालक व क्लिनरसह एकूण 10 जण जखमी झाले. स्वयंअपघाताची घटना काल रविवारी सकाळी 7.30 वा. सुमारास घडली. सुदैवाने प्राणहानी टळली. मात्र चार गंभीर जखमींना हॉस्पिसियो मडगाव येथे हलविण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींमध्ये सुचिता सुदेश गावडे (वय 40), कु. तनिष सुदेश गावडे (8), चंद्रिका चंद्रकांत गावकर (41), सुलक्षा रामा गावकर (45), पूजा उमेश गावकर (45), सोहन शंकर बेतोडकर (26) सर्वजण रा. बिबळवाडा शिरोडा, येसू बाबल वेळीप (60, पाजवाडा), अनिषा अनंत वेळीप (52, पाज शिरोडा), कदंब बसचालक राघोबा येसो नाईक (45, भाटी शिरोडा), गुणा गणेश गावडे (पाणीवाडा बोरी) अशी जखमींची नावे आहेत. कदंब बस (जीए 03 एक्स 0414) सकाळी 7 वा. बिबळवाडा निरंकाल येथून शिरोडा-फोंडामार्गे पणजीला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे निघाली होती. कामानिमित्त पणजीला जाणारे प्रवासी नेमके काल नव्हते. मात्र चतुर्थीच्या बाजारासाठी फोंडा गाठण्यासाठी महिलावर्गासह 20 प्रवासी बसमध्ये होते. पुढे पाजवाडा शिरोडा येथील बसथांब्याजवळ तिघा प्रवाशांना घेऊन शिरोड्याच्या दिशेने जात असताना साकरवाळ तोर्ल येथे हा अपघात घडला. स्टेअरिंग रॉड सुटल्याने उडालेल्या गेंधळात चालकाने रस्त्यालगतच्या आंब्याच्या झाडाला धडक दिली. या धडकेत बसमधील प्रवासी एकमेकांना सिटवर आदळल्याने गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने शिरोडा येथील इस्पितळात दाखल करण्यात आले. काहींना अधिक उपचारासाठी हॉस्पिसिओ मडगाव येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक रोहिदास भोमकर यांनी घटनेचा पंचनामा केला.
पर्वरी येथील अपघातात बेतीतील युवकाचा मृत्यू
येथील गौरी पेट्रोल पंपजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर 3.15 च्या दरम्यान म्हापसा- पणजी रस्त्यावर ट्रक आणि वेगनर कार यांच्यात अपघात होऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला. संतोष हरिजन (29, बेती, मूळ कर्नाटक) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कंटेनरला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या कारची (जीए 07 एफ 3990) पार्क केलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. यात कारचालक संतोष हरिजन जागीच ठार झाला. ट्रकचा चालक केशव नाईक (कुडाळ, महाराष्ट्र) आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
कुसमळी अपघातात म्हापशाचा युवक ठार
बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आढळून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान कुसमळी नजीकच्या वळणावर घडली. महेश रायकर (वय 30 ) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून तो म्हापसा येथील रहिवासी होता. महेश हा बेळगावला आला होता, दुपारी बेळगावहून गोव्याकडे जाताना कुसमळी नजीकच्या अतिशय धोकादायक वळणावर दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो झाडाला जाऊन धडकला, त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. अपघाताची माहिती जांबोटी पोलिसांना मिळताच जांबोटी ओपीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. आय. बडिगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूरला पाठविला. जांबोटी पोलीस अधिक तपास करत आहेत.