भाजप-शिंदे सेनेवर हल्लाबोल; रस्त्याचा निधी बाकडी, ओपन जीमकडे वळवल्याचा आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करून आणलेला निधी रद्द करून तो बाकडी आणि ओपन जिमसाठी वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. यामधून 40 टक्केचा कर्नाटकी पॅटर्न कोल्हापुरात येऊ पाहत असल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. कोल्हापूर महापालिका अंतर्गत न्यू शाहूपुरी व नागळा पार्क प्रभागातील 1 कोटींच्या निधीतून रस्ते कामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, विरोधकांचा अजेंडा वेगळा आहे. तर आम्ही कोल्हापूर शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. कोल्हापूरची जनता नेहमीच विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. तरीही यापूर्वी मंजूर केलेली विकासकामे करण्यासाठी ही संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैव आहे.
आमदार जयश्री जाधव म्हणाले, विधानसभा पोटनिवडणुकीवेळी या भागातील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी येथील रस्त्याची मागणी केली होती. त्यानुसार रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होत आहे. यावेळी माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, प्रसाद कामत, दिलीप शिर्के, संजय घाटगे, राजेश घाटगे आदी, उपस्थित होते.
निवडणुका घेण्यास सरकार घाबरते
गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेत नगरसेवक नसून प्रशासकराज आहे. देशात इतरत्र सर्व निवडणुका होत आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत असल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
आम्ही बॅटींग करताना भरघोस निधी आणला
आमदार सतेज पाटील म्हणाले, एप्रिलपर्यंत सत्तेवर असताना आम्ही बॅटिंग करीत होतो. तेव्हा कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणला. आत्ता आम्हाला फिल्डिंग करावी लागत आहे. मात्र आम्ही आणलेल्या निधीतही सत्ताधारी आडकाठी घालण्याचे धोरण अवलंबत असून हे लोकशाहीसाठी घातक आहे.
निवडून आलेले बाजूला, जनतेने नाकारलेल्यांची कामे
आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव जनतेतून निवडून आले आहेत. त्यांनी सुचवलेली विकासकामे प्रशासन करत नाही. या उलट जनतेने नाकारलेल्यांची कामे होत आहेत, हे दुर्देवी असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.