कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील कराची विद्यापीठात भीषण बाँबस्फोट घडविण्यात आला असून त्यात दोन विदेशी नागरीकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हा बाँब एका व्यापारी प्रवासी वाहनात दडविण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या कनफ्युशियस संस्थेनजीक हा स्फोट झाला. चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
स्फोटग्रस्त वाहनामधून काही प्राध्यापक प्रवास करीत होते. त्यांच्यात दोन विदेशी प्राध्यापकही होते. ते त्यांची व्याख्याने आटोपून त्यांच्या निवासस्थानी निघाले होते. वाहन सुरु असतानाच हा स्फोट झाला. त्याचा आवाज तीन किलोमीरटपर्यंत ऐकू आला असे स्पष्ट करण्यात आले. वाहनात सात ते आठ प्रवासी होते. तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात आजवर असंख्य बाँबस्फोट झालेले आहेत. मात्र विद्यापीठात असा स्फोट घडण्याची घटना दुर्मिळ मानली जात आहे. हा दहशतवादी हल्ला आहे का, याचीही चौकशी होत आहे.
दहशतवादी हल्ला असणे शक्य
अद्याप, या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. मात्र, स्फोटाची पद्धती पाहता हे कोणत्यातरी दहशतवादी संघटनेचे कृत्य असावे, असे अनुमान प्राथमिक तपासाअंती काढण्यात आले आहे. स्फोट नेमका कशामुळे घडला यासंबंधी सखोल तपासाअंतीच माहिती मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.