राणेबेन्नूर येथील राज्यस्तरीय खो खो स्पर्धा : बेळगावसह 7 जिल्हय़ांची मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड; गणेश कडोलकर अष्टपैलू खेळाडू
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
राणेबेन्नूर जिल्हा येथे कर्नाटक युवजन क्रीडा खाते व कर्नाटक अमॅच्युअर खो खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय चॅम्पियन्स चषक खो खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने म्हैसूर जिल्हा संघाचा 13 गुणांनी पराभव करून कर्नाटक चॅम्पियन्स चषक पटकाविला. बेळगाव जिल्हय़ाच्या गणेश कडोलकरला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. हा मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे.
राणेबेन्नूर येथे घेण्यात आलेल्या 14 वर्षा खालील राज्यस्तरीय चॅम्पियन्स खो खो स्पर्धेत सोमवारी बेळगाव जिल्हा संघाने साखळी स्पर्धेत विजयनगर, हावेरी व यादगिरी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने धारवाड जिल्हा संघाचा एक डाव व सहा गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱया उपांत्य सामन्यात म्हैसूर जिल्हा संघाने बागलकोट संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने म्हैसूर जिल्हा संघाचा 13 गुणांनी पराभव करून अजिंक्मयपद पटकाविले. या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने पहिल्या डावात म्हैसूरचे 13 तर म्हैसूर संघाने पहिल्या डावात बेळगाचे 6 गडी टिपले. दुसऱया डावात बेळगाव जिल्हा संघाने 11 तर म्हैसूरने बेळगावचे 6 गडी टिपले. त्यांना विजयासाठी 19 गडय़ांची गरज होती, पण त्यांनी केवळ 6 गडीच टिपता आले. त्यामुळे हा सामना बेळगाव जिल्हा संघाने 13 गडय़ांनी जिंकला.
सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव जिल्हा व उपविजेत्या म्हैसूर जिल्हा संघांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू गणेश कडोलकरला खास बक्षीस देवून गौरविण्यात आले. या संघात गणेश कडोलकर, मंथन पाटील, श्रीनाथ कडोलकर, साहील कुटे, रितेश चौगुले, राहुल गस्ती, मनिष हैरवी, शशांक मुल्लूर, सिद्धार्थ नराकी, उल्हास लमाणी, प्रशांत अटकी, शिवराज देसाई, मल्लीकार्जुन भूषण्णावर, ओमकार हिप्परगी व अरूण लमाणी या खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना एन. आर. पाटील, एल. सी. लमाणी व अशोक बुडवी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
17 ते 19 दरम्यान बेंगळूर येथे मिनी ऑलिंपिक खो खो स्पर्धेसाठी राज्यातील आठ संघांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बेळगाव, म्हैसूर, हावेरी, बागलकोट, धारवाड, बेंगळूर, रायचूर आदी संघांचा समावेश आहे. या विजयानंतर बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो खो संघटनेने विजेत्या बेळगाव जिल्हा संघाचे कौतुक केले आहे.