50 हून अधिक संघटनांचा पाठिंबा
प्रतिनिधी/ बेंगळूर
तामिळनाडूला कावेरीचे पाणी सोडण्याला विरोध दर्शवून विविध संघटनांनी 29 सप्टेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. या बंदला कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसह 50 हून अधिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याचबरोबर विविध व्यावसायिक संघटना, वाहतूक कर्मचारी, हॉटेल उद्योगपती, रिक्षा चालक, परिवहन संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सर्व दुकाने, हॉटेल्स, वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे.
बीएमटीसी, केएसआरटीसी बसेसही रस्त्यावर उतरण्याची शक्यता कमी आहे. ऑटोरिक्षांच्या वाहतुकीतही व्यत्यय येणार आहे. बंदच्या दिवशी राज्यातील चित्रपटगृहे, हॉटेल्स बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या विरोधात 26 सप्टेंबरला बेंगळूर बंदला जवळपास यश मिळाले आहे. त्यामुळे 29 सप्टेंबरचा कर्नाटक बंदही यशस्वी होण्याची शक्मयता आहे. शुक्रवारी बंदच्या दिवशी कन्नड युनियन भवनापासून स्वतंत्र्य उद्यानापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी, कन्नड सिने अभिनेते, अभिनेत्री सहभागी होणार आहेत.