अल्पसंख्याक समाजाविरुद्ध केलेल्या विधानांमुळे काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कर्नाटकातील १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्याची विनंती केली आहे. अभिषेक सिंघवी, पवनकुमार बन्सल आणि मुकुल वासनिक यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी निवडणूक मंडळाला कर्नाटक राज्यात निवडणूका पारदर्शी राबवाव्यात अशी विनंती केली.
कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान खोटी, पक्षपाती आणि सांप्रदायिक विधाने केल्याचा आरोप केला आहे. भाजप नेत्यांनी ही विधाने निवडणूकीमध्ये फायदा मिळविण्याच्या उद्देशानेच केली असल्याचा दावा करून त्यांना राज्यात प्रचार करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली.
या संबंधीची माहिती देताना सिंघवी म्हणाले, “आम्ही नुकतीच निवडणूक आयोगाबरोबर अत्यंत फलदायी आणि महत्त्वाची भेट घेतली. भाजपच्या नेतृत्वाकडून येत असलेल्या अत्यंत आक्षेपार्ह, पक्षपाती, जातीय आणि खोट्या विधानांबद्दलची तक्रार निवडणूक आयोगासमोर केली आहे.” असे ते म्हणाले.