प्रतिनिधी / धारवाड
डिझेल, सीएनजी आणि विजेवर चालणारी विविध प्रकारची वाहने पुरविण्याच्या संदर्भात कर्नाटक विकास ग्रामीण बँकेने पियागिओ व्हेईकल्स या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या करारावर बँकेचे महाव्यवस्थापक पी. श्रीनिवास राव आणि पियागिओ कंपनीच्या आर्थिक विभागाचे प्रमुख अर्घदीप रॉय यांनी स्वाक्षऱया केल्या आहेत. बँकेच्या धारवाड येथील मुख्यालयात हा सामंजस्य करार करण्यात
आला.
हा करार जनतेच्या हिताचा आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष पी. गोपीकृष्ण यांनी केले. ग्रामीण भागात रिक्षा, छोटी वाहतूक वाहने आणि इतर प्रकारची वाहने यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्माण केला जाऊ शकतो. त्यासाठी बँकेने पुढाकार घेतला आहे. रोजगारक्षम युवकांना बँकेच्या माध्यमातून अशी वाहने विकत घेण्यासाठी कर्ज दिले जाऊ शकते. बँक स्वतः या कामी पुढाकार घेत असून युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करीत आहे.
पियागिओ कंपनीशी झालेला हा करार हे याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. बँक आपल्या सर्व 629 शाखांमधून युवकांना कोणतीही अडचण येऊ न देता कर्जपुरवठा करण्यासंबंधात सेवा पुरविण्यास तयार आहे. विशेषतः ग्रामीण भाग आणि निमशहरी भागांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आतापर्यंत बँकेने 4,600 छोटय़ा वाहतूक वाहनांसाठी 110 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पियागिओ ही तीन चाकी वाहनांचे उत्पादन करणारी महत्त्वाची कंपनी असून कंपनीला या क्षेत्रात 20 वर्षांचा अनुभव आहे. कंपनीची देशभरात 500 सेवा केंद्रे आहेत. या करारामुळे कंपनीचा व्यवसायही अधिक वाढणार असून युवकांना रोजगार देण्यामध्ये हा करार यशस्वी ठरेल, असा विश्वास या प्रसंगी बोलताना पियागिओ कंपनीचे वित्तीय अधिकारी अर्घदीप रॉय यांनी व्यक्त केला.