निलजी कुस्ती मैदान : संगमेश बिराजदार, प्रवीण निलजी यांची प्रेक्षणीय विजय, लढती निकाली झाल्याने शौकिन खुष
युवराज पाटील/उमेश मजुकर /बेळगाव
निलजी येथे ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना व निलजी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य कुस्ती मैदानात प्रमुख कुस्तीत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटेने अमितकुमार दिल्लीला अकराव्या मिनिटाला पायाला एकलांगी भरुन हाताचा एककस चढवित एकलांगी डावावरती अस्मान दाखवून उपस्थित 20 हजारहून कुस्ती शौकिनांची मने जिंकली. सायंकाळी 8.40 मिनिटांनी प्रमुख कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे राष्ट्रीय चॅम्पियन अमितकुमार दिल्ली ही कुस्ती महाराष्ट्र एकिकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, आर. आय पाटील, भरत पाटील, रमेश मोदगेकर, अॅड. लक्ष्मण पाटील व ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना निलजीच्यावतीने लावण्यात आली. या कुस्तीत पहिली दोन मिनिटे दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली. तिसऱ्या मिनिटाला अमितकुमारने एकेरी पट काढून कार्तिक काटेला खाली घेत घीस्स्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. परंतु अनुभवी कार्तिकने त्यातून सुटका करुन घेतली. सहाव्या मिनिटाला अमितकुमारने दुहेरी पट काढून कार्तिकवर कब्जा मिळवित झोळी बांधून फिरविण्याचा प्रयत्न केला. परंतु अनुभवी कार्तिकने त्यातून रितसर सुटका करुन घेतली. दहाव्या मिनिटाला कार्तिक काटेने पायाला चाट मारत आकडी लावून खाली घेतले व पायाला एकलांगी भरुन चीत करण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु अमितने खालूक डंकी मारुन वरती येण्याचा प्रयत्न करीत असताना एकलांगी घट्ट बांधून हाताचा कस चढवत अकराव्या मिनिटाला अमितकुमारला अस्मान दाखवून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व भावी सावंत सांगली ही कुस्ती निलजी गावचे श्रीराम सेनेचे कार्यकर्ते भरत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्याच मिनिटाला भावी सावंतने एकेरी पट काढून संगमेशवर कब्जा मिळविला व मानेचा कस काढून घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण संगमेशने त्यातून सूटका करुन घेतली. चौथ्या मिनिटाला संगमेश बिराजदारने दुहेरी पट काढून भावी सावंतवर ताब मिळवित मानेवर घुटणा ठेऊन फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यातून भावी सावंतने सुटका करुन घेतली. आठव्या मिनिटाला संगमेशने एकेरी पट काढून भावीला घाली घेत झोळी भरण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून सुटका करुन घेणार असे वाटत असताना संगमेशने निकाल डावावर भावी सावंतला चीतपट केले.
तिसऱ्या कुस्तीत निलजी कुस्तीगीर संघटनेच्या हस्ते किर्तीकुमार कार्वे व उदयसिंग रजपूत सांगली ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत किर्तीकुमार कार्वेने उदयसिंग रजपूतचा आठव्या मिनिटाला घुटणा डावावरती चीत केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत किरण अष्टगी कलखांबने राकेश घाटगे कोल्हापूर याचा घीस्सा डावावरती पराभव केला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रेम कंग्राळीने प्रदीपचा घीस्सा डावावरती पराभव केला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रवीण निलजीने चेतन कोळी कोल्हापूरचा कोंदल एकचाक डावावरती विजय मिळवून मेंढ्याचे बक्षीस पटकाविले. सातव्या क्रमांकाच्या कुस्ती पंकज चापगाव व गुत्याप्पा दावणगिरी ही कुसती डावप्रतिडावाने झुंजली पण वेळे अभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन चिक्कदिनकोपने पृथ्वीराज पाटील कंग्राळीचा गदेलोट डावावरती विजय संपादन केला. नवव्या क्रमांकच्या मेंढ्याच्या बक्षीसाच्या कुस्तीत संकल्प कंग्राळीने नेताजी भोसले कोल्हापूर याचा झोळी डावावर पराभव करुन मेंढ्याचे बक्षीस पटकाविले. दहाव्या क्रमांकाची कुस्ती निरंजन येळ्ळूर व बबलू नरळे कोल्हापूर ही कुस्ती डावप्रतिडावाने रंगली पण वेळे अभावी बरोबरीत सोडविण्यात आली. त्याचप्रमाणे ओम कंग्राळीने घुटण्यावर, रोहित माचिगाडने एकचाकवर, राजू डागेकरने एकचाकवर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय संपादन केला. त्याचबरोबर राजू निलजी, हर्षद निलजी, आर्यन निलजी, पार्थ तिर्थकुंडे, स्वप्निल सावगाव, आदित्य कडोली, शिवम कडोली, करण खादरवाडी, केशव सांबरा, वैभव सांबरा, सिद्धार्थ तिर्थकुंडे, हर्ष कंग्राळी, शिवम मुतगा आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
गदेच्या कुस्ती स्पर्धेत शुभम पाटीलने बबलू कोल्हापूरचा कलाजंग डावावर विजय संपादन केला. तर दुसऱ्या कुस्तीत सुशांत कंग्राळीने समीर कोल्हापूरचा एकचाक डावावरती विजय मिळवून गदेचे बक्षीस पटकाविले. प्रारंभी आखाड्याचे उद्घाटन रामा हिरापाचे यांनी केले. आखाड्याचे पूजन श्रराम सेना हिंदुस्थानचे भरत पाटील यांनी केले. हनुमान प्रतिमा पूजन बसवंत गाडीव•र यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अॅड. लक्ष्मण पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन गंगाराम मोदगेकर, किशोर मोदगेकर, प्रकाश धाणगावने, बसवंत पाटील, गुंडू पाटील, गोपाळ पाटील, चंद्रकांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. रमेश पाटील होते. आखाड्यातील पंच म्हणून नवीन मुदगे, काशिराम पाटील कंग्राळी, गणपत बन्नोशी, सुरेश पाटील, बाबू कल्लेहोळकर, भोपाळ पाटील, मारुती पाटील, कृष्णा हिरापाचे, आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले. तर ओमकार दाबाडेने आपल्या रणालगीच्या तालावर कुस्ती शौकिनांना खेळून ठेवले.