विठ्ठल मंदिरांतून टाळ-मृदंगाचा गजर : सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची वर्दळ
प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात शुक्रवारी कार्तिकी एकादशी भक्तीभावाने साजरी केली. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व मंदिरांतून टाळ-मृदंगाच्या गजरात विठुनामाचा गजर झाला. पहाटे विठ्ठल मंदिरांतून काकडारती, अभिषेक, पूजा, भजन, रात्री जागर भजन, कीर्तन सोहळा रंगला. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा कार्तिकी एकादशी उत्साहात पार पडली.
शहरातील महाद्वार रोड येथील ज्ञानेश्वरी माऊली, विठ्ठल-रखुमाई मंदिर, खडेबाजार येथील विठ्ठल मंदिर, नामदेव दैवकी संस्थेचे विठ्ठल मंदिर, बापट गल्ली येथील विठ्ठल मंदिर, शहापूर येथील विठ्ठल मंदिर आदी मंदिरांतून एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर पारंपरिक पद्धतीने दिंडी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी भक्त पंढरपुरात एकवटतात. शिवाय ज्यांची आषाढी वारी आहे आणि जे पंढरपूरला भेट देऊ शकत नाहीत, असे भक्त स्थानिक मंदिरांतूनच दर्शन घेऊन एकादशी साजरी करतात. मागील दोन वर्षात कोरोनामुळे प्रत्यक्ष वारी झाली नाही. केवळ प्रतिकात्मकरुपात एकादशी साजरी झाली होती. यंदा मंदिर सर्वांना खुले केले आहे. त्यामुळे पंढरपुरकडे लाखो भाविक रवाना झाले आहेत. शहरातील विठ्ठल मंदिरांतून कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी केली.
उपवासाच्या पदार्थांची रेलचेल
बाजारात शुक्रवारी कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वरी तांदूळ, साबूदाणा, केळी, शेंगदाणे, खजूर, राजगिरा लाडूसह उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली होती. आषाढी व कार्तिकी एकादशीला उपवास करणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची रेलचेल पहायला मिळाली.
वडगाव, बाजार गल्ली येथील विठ्ठलदेव मंदिर
वडगाव, बाजार गल्ली येथील विठ्ठलदेव मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त मंदिरात सफरचंदाची आरास केली होती. याबरोबर सकाळपासून धार्मिक विधी पार पडला. त्याबरोबर दर्शनासाठी नागरिकांची दिवसभर वर्दळ पहायला मिळाली.
महिला विद्यालय मंडळ, मराठी प्राथमिक शाळा
महिला विद्यालय मंडळ, मराठी प्राथमिक शाळेत शुक्रवारी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेपासून दिंडीला सुरुवात होऊन गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, विठ्ठलदेव मंदिरमार्गे पुन्हा शाळेत सांगता झाली. या दिंडीमध्ये विद्यार्थी वारकऱयांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. याबरोबर शिक्षक देखील उपस्थित होते.