कोल्हापूर प्रतिनिधी
शहरासह अवघी करवीरनगरी 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवमय झाली आहे. विविध सामाजि संस्था, मंडळांनी दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज, मंगळवारी येथे मुख्य सोहाळा होणार असून भव्य मिरवणुकीही निघणार आहेत. एकूणच शिवराज्याभिषेक दिनानिमित्त करवीरनगरी सज्ज झाली आहे.
दरवर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा केला जातो. माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली रायगड येथे भव्य स्वरूपात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला जातो. तर कोल्हापुरातही त्याच जोमाने विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. शहरासह करवीरनगरीमध्ये या सोहळ्यासाठी आठ दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात येत आहे. शिवाजी चौक, निवृत्ती चौकातील शिवपुतळ्यास केलेल्या आकर्षक विद्युतरोषणाईने परिसर उजळून गेला आहे.
यंदा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा 2 जून रोजी साजरा झाला. यामुळे 1 ते 6 जून असे सुमारे आठवडाभर कोल्हापुरात शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. आज मंगळवारी नवीन राजवाड्यात विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. सकाळी साडेसात ते 10 यावेळेत येथे हा सोहळा होणार आहे. झांज पथक, सनई चौघडा वादन, पोवाडा, शौर्य गीत आदींचा समावेश आहे. निवृत्त चौकामध्ये शुक्रवारपासूनच विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. आज, मंगळवारी येथील शिवपुतळ्यास सकाळी 7 वाजता अभिषेक घालण्यात येणार असून सायंकाळी 7 वाजता स्पर्धेचे बक्षिस वितरण व मराठी गीतांचा कार्यक्रम आहे..
मराठा महासंघाच्यावतीन भव्य मिरवणूक
मराठा महासंघ, राजर्षी शाहू सलोखा मंच आणि विविध सामाजिक संस्था, संघटनेच्यावतीने आज, मंगळवारी सायंकाळी 5 वाजता शिवराज्याभिषेक मिरवणुकीचे आयोजन केले आहे. मंगळवार पेठेतील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून मिरवणुकीला सुऊवात होणार असून वारकऱ्यांसह मर्दानी खेळ, लेझीम, झांजपथक आकर्षण असणार आहे.
राजदरबार हॉलचे विशेष आकर्षण
राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळ व शिवालय भजनी मंडळाच्यावतीने 1974 पासून रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. यास 50 वर्षे पूर्ण झाल्याने तसेच 350 व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन मंडळाने खासबाग चौकात 4 ते 6 मे दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथे भव्य अशी 50 बाय 100 फुटाच्या ऐतिहासिक राजदरबार हालची प्रतिकृती उभारली आहे. आज, सोमवारी सायंकाळी 5 वाजता राजदरबार हॉलमध्ये पुंकूमार्चन सोहळा होणार आहे. सायंकाळी 7 वाजता मर्दानी खेळाची प्रात्याक्षिके आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजता शिवप्रतिमेचे विधीवत पूजा करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे.
शिवसेनेचा पन्हाळा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा
शिवसेना ठाकरे गटाचा पन्हाळा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा होणार आहे. सकाळी 7 वाजता येथील सर्व मंदिरात अभिषेक, शिवमूर्तीस राज्यातील गडकोटावरील आणलेल्या पाण्याने जलाभिषेक घातला जाणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचा शिवाजी चौकात दुगधाभिषेक
शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आज, मंगळवारी सकाळी 10 दुग्धाभिषेक घालणार आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.