’ग्लोबल वॉर्मिंग-काश्मीर चॅप्टर’ मधून वास्तवाचे दाहक चित्रण ; पर्यावरण महोत्सवात सरस चित्रपटांची मांदियाळी
पणजी : सध्याच्या ग्लोबल वॉर्मिगच्या दाहकतेत काश्मीरसारख्या बर्फमय प्रदेशाचीसुद्धा कशी होरपळ सुरू आहे, त्याचे सुंदर चित्रण असलेला ’ग्लोबल वॉर्मिंग-काश्मीर चॅप्टर’ हा चित्रपट काल पर्यावरण चित्रपट महोत्सवात दुसऱ्या दिवशी दाखविण्यात आला. माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित पर्यावरण चित्रपट महोत्सवात तीन दिवस दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येत असून पर्यावरणासंबंधी भारतीय चित्रपटांसह जगभरातील विविध देशांच्या पर्यावरणीय समस्या मांडणाऱ्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. घाना सारख्या देशातील दारिद्रयाचे वास्तव मांडणारा ’द बर्निंग फिल्डस्’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला आहे. ’ग्लोबल वॉर्मिंग-काश्मीर चॅप्टर’ या चित्रपटातून काश्मीरचे वेगळेच सत्य सादर करण्यात आले आहे. अॅपल, केशर, बदाम, चेरी यासारख्या फळे आणि अन्य शेती उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या काश्मीरमधील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंग अर्थात हवामान बदलाचे परिणाम भोगत आहेत. वर्ष 2014 सर्वकाही सुरळीत चालणारी तेथील परिस्थिती अचानक बदलू लागली आहे. पूर्वी काश्मीरमध्ये डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे तीन महिनेच बर्फ पडत असे. त्याच प्रमाणे पाऊसही त्याच्या निर्धारित कालावधीतच होत असे. त्यामुळे तेथील शेतकरी सुखवस्तू जीवन जगत होते.
शेतकऱ्यांसह, उद्योगधंद्यांवरही संक्रात
परंतु 2014 पासून हे निसर्गचक्रच बदलत चालल्यामुळे तेथील शेतकऱ्यांसह अन्य उद्योगधंद्यांवरही संक्रात आली आहे. अॅपल, केशर, ही उत्पादने म्हणजे काश्मीरचे वैशिष्ट्या होते. आता बर्फ आणि पाऊस कधीही आणि कसाही कोसळत असल्याने सर्व उत्पादने मोहरण्याच्या अवस्थेतच करपून जाऊ लागली आहेत. परिणामी आपल्या शेतात अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांवर स्वत:च अक्षरश: ’मनरेगा’ ची कामे करून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे, अशी एकुण परिस्थिती या चित्रपटातून दाखविण्यात आली आहे. जलालुद्दीन बाबा यांनी दिग्दर्शन केले असून पणजीतील महोत्सवात या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त रविवारी ते स्वत: उपस्थित राहिले होते. चित्रपटाच्या प्रारंभी आयोजकांतर्फे भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी चित्रपट निर्मितीमागील उद्देश कथन केला. दरम्यान, आज सोमवार दि. 5 जून रोजी या चित्रपट महोत्सवाचा समारोप होणार आहे. मॅकनिज पॅलेसमध्ये आयोजित या महोत्सवात आज दिवसभरात सहा चित्रपटांचे प्रदर्शन होणार असून त्यानंतर समारोप सोहळा होणार आहे.