महिला आरक्षणाची मागणी ः 17 विरोधी पक्षांच्या नेत्यांची हजेरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी शुक्रवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे महिला आरक्षण विधेयकाच्या मागणीवरून एक दिवसीय उपोषण केले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्याची मागणी त्यांनी केली आहे. आम आदमी पक्ष, अकाली दल, पीडीपी, तृणमूल काँग्रेस, संजद, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, रालोद, नॅशनल कॉन्फरन्स आणि समाजवादी पक्षासमवेत एकूण 17 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी उपोषणस्थळी भेट देत के. कविता यांना पाठिंबा दर्शविला आहे.
महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर मांडले जाण्याची गरज आहे. हे विधेयक मांडले जात नाही तोवर हे आंदोलन थांबणार नाही. हे विधेयक देशाच्या विकासाला हातभार लावणार असल्याचा दावा के. कविता यांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी के. कविता यांना धरणे आंदोलनाची अनुमती दिली नव्हती.
मागील 27 वर्षांपासून महिला आरक्षण विधेयकासाठी संघर्ष सुरू आहे. अनेक सरकारे बदलली, तरीही हे विधेयक मंजूर झालेले नाही. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण असायला हवे. या विधेयकासाठी स्वतःची लढाई सुरूच ठेवणार आहे. भाजपने 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत महिला आरक्षण विधेयकाचे आश्वासन दिले होते, परंतु आता यावर बोलणे टाळत असल्याचा आरोप के. कविता यांनी केला आहे.
के. कविता यांची होणार चौकशी
दिल्ली अबकारी घोटाळय़ाप्रकरणी ईडीने कविता यांना 11 मार्च रोजी चौकशीसाठी बोलाविले आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. ज्या राज्यात निवडणूक असते, तेथे मोदींपूर्वी ईडी पोहोचत असल्याचा आरोप कविता यांनी केला आहे. जंतर-मंतर येथील धरणे आंदोलनानंतर ईडीसमोर हजर राहण्यासंबंधी स्वतःच्या टीमसोबत सल्लामसलत करणार आहे. चौकशीत मी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी कविता यांची सीबीआयने हैदराबादमध्ये सुमारे 7 तासांपर्यंत चौकशी केली होती.
कविता यांचा निकटवर्तीय अटकेत
ईडी दिल्ली अबकारी घोटाळय़ाप्रकरणी चौकशी करत आहे. कविता यांचा निकटवर्तीय अरुण रामचंद्रन पिल्लईला ईडीने अटक केली आहे. अबकारी धोरणात बदल करण्यासाठी पिल्लईने आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. के. कविता या ‘साउथ कार्टेल’चा हिस्सा आहेत, साउथ कार्टेलनेच लाच देत दिल्लीच्या अबकारी धोरणात स्वतःला अनुकूल बदल घडवून आणल्याचे ईडीने म्हटले आहे. साउथ कार्टेलमध्ये कथितपणे के. कविता, मगनुनता श्रीनिवासलु रेड्डी यांच्यासह काही व्यावसायिकांचा सहभाग आहे.