पाणीपुरवठा कामगारांचे आंदोलन
बेळगाव : राज्यातील महानगरपालिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे, तसेच किमान वेतन देण्यात यावे, याकरिता कर्नाटक राज्य महानगरपालिका पाणीपुरवठा नोकर संघटनेच्यावतीने सुवर्णसौध येथे आंदोलन केले.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून महानगरपालिकांमध्ये पाणीपुरवठा नियोजनाचे काम करीत आहेत. पण या कामगारांना सेवेत कायम करण्यात आले नाही. शहरवासियांना नियमित पाणीपुरवठा करून नागरिकांची तहाण भागविली जाते. लॉकडाऊनसह कोरोनाकाळात आपली सेवा व्यवस्थित बजावून नागरिकांची सोय केली होती. पण शासनाकडून कामगारांना कोणत्याच सुविधा दिल्या नाहीत. त्यामुळे सेवेत कायम करण्यासह किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली.
पाणीपुरवठा योजना राबवून पाणीपुरवठा नियोजन खासगी कंपन्यांकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. खासगीकरणामुळे पाणीपुरवठा कामगार अडचणीत आले आहेत. त्यामुळे कंत्राट पद्धतीने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे, तसेच शासनाच्या नियमानुसार किमान वेतन, पगारी रजा, राष्ट्रीय सणादिवशी सुटी, तसेच विविध सुविधा देण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. याची पूर्तता शासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली.