मंडळाने दिव्यांग मुलांची शाळा, इस्पितळासाठी पुढाकार घेतल्यास साहाय्य करू : काब्राल
केपे : केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिव्यांग मुलांसाठी शाळा व इस्पितळ बांधण्याची तयारी केल्यास सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे त्यांना जमीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची तसेच आर्थिक साहाय्यही देण्याची तयारी मंत्री नीलेश काब्राल यांनी दर्शवली आहे. केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपन विक्रीच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, केपेच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, नगरसेवक फिलू डिकॉस्ता, अमोल काणेकर, गणपत मोडक, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष इच्छित फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते. मंत्री काब्राल पुढे बोलताना म्हणाले की, केपेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लोकांची सेवा चांगल्या प्रकारे केली आहे. म्हणून हे मंडळ गोव्यात अग्रस्थानी आहे. खासदार सदानंद तानावडे यांनीही मंडळाच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिरवईकर यांनी केले.