पंजाबमध्ये वाढविली सुरक्षा
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
ब्ल्यू स्टार ऑपरेशनला मंगळवारी 39 वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाबमधील वातावरण बिघडू नये यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. निमलष्करी दलांच्या तुकड्यांसोबत पंजाब पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विदेशात पुन्हा खलिस्तानी समर्थक चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात खलिस्तानी समर्थकांनी मोठ्या संख्येत खलिस्तानी झेंडे फडकविले आहेत.
कॅलिफोर्नियाच्या साउथ फ्रान्सिस्को येथील सिविक सेंटरबाहेर हजारो शीखधर्मीय एकत्र आले. यात खलिस्तानी समर्थक देखील पोहोचले आणि त्यांनी खलिस्तानी झेंडे फडकविले आहेत. तसेच उपस्थित लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न खलिस्तान समर्थकांनी केला आहे.
ब्ल्यू स्टार ऑपरेशनला 39 वर्षे पूर्ण होणार असल्याने पूर्ण पंजाबमधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली आहे. अमृतसरमध्ये 3500 जवान तैनात करण्यात आले असून निमलष्करी दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 6 जून रोजी काही संघटनांकडून पंजाब बंदचे आवाहन करण्यात आले आहे.