पासपोर्ट, ओसीआय कार्ड रद्द करण्याची तयारी : कठोर कारवाईसाठी केंद्र सरकार सज्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत सरकारने रविवारी तपास यंत्रणांना अमेरिका, ब्रिटन, पॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील सर्व खलिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांना भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्यास सांगितले. संबंधित खलिस्तानवाद्यांचे ओसीआय कार्ड (विदेशस्थ भारतीय नागरिक प्रमाणपत्र) रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परदेशातील भारतीय संस्था, वाणिज्य आणि अन्य दुतावासांवर हल्ले करणाऱ्यांचे पासपोर्ट रद्द करण्याची तयारी सुरू आहे.
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) पॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या भारतातील मालमत्ता जप्त केल्याच्या एका दिवसानंतर आणखी एक कडक पवित्रा उचलला आहे. भारत सरकारने विविध तपास यंत्रणांना परदेशात स्थायिक झालेल्या दहशतवाद्यांची मालमत्ता तपासण्याच्या सूचनाही केल्या असून त्यावरही नजिकच्या काळात कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी अनेक एजन्सींनी पन्नूवर दाखल केलेल्या गुन्ह्यांचा आधार घेत त्याची सर्व मालमत्ता जप्त केली आहे. तसेच युएपीएच्या चौथ्या अनुसूची अंतर्गत पन्नूला ‘घोषित दहशतवादी’ असे संबोधण्यात आले आहे.
दहशतवाद्यांच्या प्रवेशावर बंदी घालणार
सरकारी पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने तपास यंत्रणांना अमेरिका, ब्रिटन, पॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यास सांगितले आहे. या सर्वांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येणार आहे. केंद्र सरकार दहशतवाद्यांवर तसेच त्यांच्या साथीदार, मदतनीसांवर कारवाई करेल. या सर्व लोकांची मालमत्ता आणि बँक खाती शोधण्यात येत असून ती जप्त करण्यात येणार आहेत.
दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने खलिस्तानी दहशतवाद्यांची नवी यादी जारी केली आहे. यामध्ये एकूण 19 नावे आहेत. यामध्ये ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 7 आणि अमेरिकेत राहणाऱ्या 5 खलिस्तानींचा समावेश आहे. परदेशात राहून भारताविरोधात भारतविरोधी प्रचार करणाऱ्यांचा या यादीत समावेश असून त्यांच्या निकटवर्तियांवरही करडी नजर ठेवली जात आहे.
‘ओसीआय’ कार्डच्या वापरावर निर्बंध
खलिस्तान समर्थक भारतात विशेषत: पॅनडासारख्या दूरच्या देशात राहून त्यांच्या गुन्हेगारी कारवाया करतात. या लोकांकडे ‘ओसीआय’ कार्ड असल्यामुळे त्यांच्या भारतात येण्या-जाण्यावर कोणतेही बंधन नाही. यावर कारवाई म्हणून सरकार आता सर्व खलिस्तानी समर्थकांचे ‘ओसीआय’ कार्ड रद्द करणार आहे. खलिस्तानी समर्थक परदेशात बसून भारताविऊद्ध कट रचत असल्यामुळे भारतात गुन्हेगारी घटना घडतात. या कारनाम्यांचीच गंभीर दखल घेत केंद्र सरकारने आता कडक पवित्रा घेतला आहे.