प्रतिनिधी/ वडूज
खटाव येथील उद्योन्मुख खेळाडू ध्रुव मिलींद लावंड याने रायपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 14 वर्षे मुले गटामध्ये 60 मीटर धावणे, लांब उडी आणि भाला फेक असे तीन क्रीडा प्रकार एकत्र असलेल्या ट्रायथलॉन या क्रीडा प्रकारामध्ये सिल्व्हर मेडल मिळवले आहे.
संघर्ष पूर्ण झालेल्या स्पर्धेमध्ये ध्रुवला थोडक्यात सुवर्णपदकापासून हुलकावणी भेटली आहे. 14 वर्षाखालील गटामध्ये ध्रुव लावंड हा सातारा जिल्हय़ातील एकमेव खेळाडू आहे. त्याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी करत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक प्राप्त केले आहे. ध्रुव हा वयाच्या 10 वर्षापासून खेळाचे सातत्याने सराव करत आहे. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवणे हे त्याचे ध्येय आहे. त्यासाठी तो आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्याकडे क्रीडा प्रशिक्षण घेत आहे. सकाळ संध्याकाळ मिळून तो दररोज 5 तास खेळाचा सराव करत असतो. मूळचा खटाव गावचा ध्रुव लावंड हा युनिव्हर्सल स्कूल सातारा या शाळेत शिकत असून तो खेलो इंडीया ऍथलेटिक्स सेंटरचा खेळाडू आहे. सातारा जिह्यासाठी केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेंतर्गत ऍथलेटिक्स सेंटर मंजूर झाले आहे. जिल्हा क्रीडा प्रशासनाच्या वतीने हे सेंटर सुरू आहे.
या यशाबद्दल ध्रुवचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्याला पुढील स्पर्धेसाठी क्रीडा प्रशासन, सातारा जिल्हा ऍथलेटीक असोसिएशन, शैक्षणिक संस्था, क्रीडा संघटना, क्रीडा प्रेमी नागरिक यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत.