काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा आरोप : कायदा-सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्री अपयशी
पणजी : एकेकाळी ‘पप्पू’ म्हणून हिणवणारे आमदार रोहन खंवटे यांना खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीच सन्मानाने स्वपक्षात प्रवेश देऊन मंत्रीपदही बहाल केले. आज तेच मंत्री पर्वरीचे अनभिषिक्त सम्राट बनले असून सध्या त्यांनी पर्वरीचे अक्षरश: ‘जंगलराज’ बनविले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास लवकरच पर्वरी ही ‘गुन्हेगारीची राजधानी’ बनू शकते, असा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे. काल रविवारी पणजीत पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, पर्वरी गटाध्यक्ष मारियो आताईद, पक्षाचे नेते विकास प्रभुदेसाई आणि रामकृष्ण जल्मी आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान भाजप सरकारात कुणाचा पायपोस कुणाच्यात राहिलेला नाही. प्रत्येक मंत्री स्वत:च्या मतदारसंघाचा मुख्यमंत्री असल्याच्या थाटात वावरत असून प्रत्येकाने स्वत:चे ‘सुपर लॉ’ निर्माण करून स्वमर्जीनुसार कामे करण्यात येत आहेत. अशा मनमानीपणातून पोलीस तसेच अन्य बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्यात येत आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.
कायदा, सुव्यवस्था राखण्यात अपयश
राज्यात कायदा, सुव्यवस्था पार लयास गेली आहे. महिलांवरील गुन्हे, खून, अपघात यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पूर्ण अपयशी ठरले आहेत, असे चोडणकर म्हणाले. पर्वरीत तर सध्या अराजकच माजले आहे. मंत्री रोहन खंवटे यांच्यामुळे एका शांत प्रदेशात कधी नव्हे एवढी अशांती पसरली आहे. लोक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. मंत्र्याच्या विरोधात बोलल्यास स्थानिकांवरच हल्ले होत आहेत आणि त्यांची केस घेण्यासाठी कुणी वकीलसुद्धा पुढे येत नाहीत. हे आपले मत नसून वरिष्ठ वकील सुरेंद्र देसाई यांनी स्वत: खुल्या न्यायालयात सांगितले आहे, असे चोडणकर यांनी सांगितले. यावरून राज्यात वकील आणि न्यायाधीशही सुरक्षित नाहीत, हेच स्पष्ट होत आहे, असे चोडणकर म्हणाले.
सत्ता बदलासाठी सरपंचावर दबाव
सध्या पर्वरी येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात सदर अधिकारी मंत्री खंवटे यांना हवे तसे करण्याची धमकी सरपंच रोशनी सावईकर आणि त्यांचे पती राजेश यांना देत आहे. ही स्थानिक पंचायत भाजपकडेच असली तरी पंचायतीमधील राजकीय सत्ता बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. त्याही पुढे जाताना सदर सरपंच दबावाला बळी पडत नसल्यामुळे सुनील देसाई नामक एक गुजराती व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावरून पर्वरीत सध्या कशाप्रकारची दहशत आहे याचा अंदाज येतो, असे चोडणकर यांनी सांगितले. या व्यक्तीची मजल एवढी पुढे गेली आहे की, ते दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आपल्या ‘खिशात’ असल्याचे सांगत आहेत, असा दावा चोडणकर यांनी केला आणि मुख्यमंत्री एवढे हतबल झाले आहेत का? असा सवाल उपस्थित केला.
2020 मधील हत्याकांडाचे काय झाले? : प्रभुदेसाई
दरम्यान, प्रभुदेसाई यांनी बोलताना, पर्वरी मतदारसंघ सध्या सर्व गुह्यांचे केंद्र बनले असल्याचा आरोप केला. यापूर्वी 2020 मध्ये घडलेल्या हत्याकांडाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी रेटा लगावणारे खंवटे स्वत: मंत्री बनल्यानंतर सर्व काही विसरले, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. आताईद यांनीही पर्वरीतील सध्यस्थितीवर उजेड टाकणारी अनेक उदाहरणे यावेळी दिली.
चोडणकरनी स्वत:ची सोडियम चाचणी करून घ्यावी : खंवटे
गिरीश चोडणकर यांनी स्वत:ची सोडियम पातळीची चाचणी लवकर करून घ्यावी, असा उपरोधिक सल्ला त्यांना पर्यटन आणि आयटीमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी केलेले विधान ऐकून आपणास त्यांची किव येते असे सांगून खंवटे म्हणाले की, त्यांची परिस्थिती अगदी सोडियम पातळी उतरलेल्या रूग्णासारखी झाली आहे. सोडियमची पातळी उतरल्यावर एखादी व्यक्ती जशा आपल्या संवेदना हरवते तशी स्थिती चोडणकर यांची झाल्याचा दावा खंवटे यांनी केला. चोडणकर तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप करण्यात माहीर आहेत. सारा गोवा त्यांची ही सवय जाणून आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची आपणास काही फारशी गरज वाटत नाही, कारण त्यांची सोडियम पातळी उतरली आहे, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. चोडणकर यांनी ते कोणत्या जबाबदारीने बोलतात ते आधी स्पष्ट करावे. शेजारची किमान 4 तरी मते त्यांच्या पारड्यात पडतील का हे देखील त्यांनी एकदा पडताळून पहावे. स्थानिक पंचायतीचा किमान पंच सदस्य होण्याचीही ज्यांची पात्रता नाही त्यांनी इतरांवर दगडफेक करून नये, असा सल्लाही खंवटे यांनी चोडणकर यांना दिला. काँग्रेस पक्षाने आपले विश्वासू आणि बुद्धिवादी पुढारी गमावले आहेत. त्यामुळेच चोडणकरसारख्या लोकांना घेऊन पक्षाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. कदाचित काँग्रेस हा देशातील एकमेव असा राजकीय पक्ष असेल जो अयशस्वी आणि अकार्यक्षम लोकांना घेऊन धडपडत आहे, असे खंवटे पुढे म्हणाले.