प्रतिनिधी /बेळगाव
केएलई स्कूल ऑफ म्यूझिक आणि इंद्रधनुष्य ट्रस्टतर्फे नुकताच ख्याल गायन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी बेळगाव, गोवा, शिरसी, धारवाड, शिमोगा, हुबळी, विजापूर, कोल्हापूर या भागातून 55 स्पर्धकांनी भाग घेतला होता. अ गटात 16 वर्षाच्या खालील 18 स्पर्धक आणि ब गटात 17 ते 25 या वयोगटांमधील 37 स्पर्धकांनी भाग घेतला होता. अ गटासाठी प्रथम क्रमांक 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक 5000 रु. आणि तृतीय क्रमांकासाठी 3000 रुपयांची आणि ब गटासाठी अनुक्रमे 15000, 10,000, 5000 रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
सर्व स्पर्धक अतिशय तयारीने गायिले. ही स्पर्धा खूप अटीतटीची झाली. अ गटात प्रथम पारितोषिक कु अनिमीश हेगडे बेळगाव याने पटकाविले, तर ब गटामध्ये पहिला क्रमांक निषाद हरलापूर शिमोगा यांनी पटकाविला. परीक्षणाचे काम पं. अशोक कुंदगोळ आणि डॉ. सुमित्रा गदग यांनी केले. या कार्यक्रमासाठी केएलई युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, आजच्या या स्पर्धेला प्रतिसाद बघता दरवषी या स्पर्धा घेतल्या पाहिजेत, असे सांगून सर्व स्पर्धकांचे त्यांनी कौतुक केले.
स्कूल ऑफ म्यूझिकचे कॉर्डिनेटर डॉ. राजेंद्र भांडणकर यांनी इंद्रधनुष्य ट्रस्ट तसेच स्कूल ऑफ म्यूझिकची माहिती सांगितली. स्कूल ऑफ म्यूझिकच्या प्राचार्या डॉ. स्नेहा राजुरीकर यांनी स्वागत केले. डॉ. दुर्गा नाडकर्णी यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. डॉ सुनिता पाटील यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रभाकर कोरे, उपकुलगुरु डॉ. विवेक सावजी, रजिस्टार डॉ. व्ही. ए. कोठीवाले, आशाताई कोरे, स्कूल ऑफ म्यूझिकचा सर्व स्टाफ आणि रसिक उपस्थित होते.
तबल्याची साथ-संगत जितेंद्र साब्बण्णावर आणि राहुल मंडोळकर तसेच संवादिनी साथ यादवेंद्र पुजारी आणि योगेश रामदास यांनी केली. सूत्रसंचालन प्रतिभा कळ्ळीमठ यांनी केले. बक्षीस समारंभात सर्व विजेत्या स्पर्धकांनी आपली कला सादर केली. पं अशोक नाडगीर यांनी भैरवी सादर करुन कार्यक्रमाची सांगता केली.