वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे 24 एप्रिल ते 3 मे दरम्यान होणाऱया ‘खेलो इंडिया’ विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत देशातील 189 विद्यापीठांचे 4529 खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा युवजन खात्याचे सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी दिली.
सदर स्पर्धा 2021 साली घेण्याचे निश्चित केले होते. पण कोरोना महामारी समस्येमुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. 24 एप्रिलपासून बेंगळूरमध्ये होणाऱया या स्पर्धेमध्ये योगासन आणि मलखांब या दोन नव्या क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आल्याची माहिती चतुर्वेदी यांनी पत्रकारांना दिली. या स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षपद कर्नाटक युवा क्रीडा खात्याचे मंत्री डॉ. के.सी. नारायण गौडा यांनी भूषविले.
या स्पर्धेचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेचे यजमानपद जैन ग्लोबल विद्यापीठ भूषविणार आहे. या विद्यापीठाच्या संकुलातील पाच ठिकाणी सदर स्पर्धेतील क्रीडा प्रकार घेतले जाणार आहेत. बेंगळुरातील जैन स्पोर्टस् स्कूल, कंठीरेवा स्टेडियम, फिल्ड मार्शल करीअप्पा हॉकी स्टेडियम आणि बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये विविध क्रीडा प्रकार होणार आहेत. या स्पर्धेमध्ये 20 क्रीडाप्रकारात एकूण 275 सुवर्णपदकांसाठी क्रीडापटूंमध्ये चुरस राहील. या स्पर्धेसाठी खर्चाची रक्कम अंदाजे 52 कोटी रूपयें राहील. यापैकी 35 कोटी रूपये केंद्रीय क्रीडा युवजन खात्यातर्फे दिले जाणार आहेत. सदर स्पर्धेतील क्रीडाप्रकारांचे समालोचन अखिल भारतीय नभोवाणीवरून तसेच दूरदर्शन आणि विविध सोशल मिडियाच्या सहाय्याने दूरदर्शनच्या विविध वाहिन्यावर या स्पर्धेचे प्रक्षेपण केले जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंसाठी जैन विद्यापीठातील 3500 खोल्या, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 1500 खोल्या तसेच कंठीरेवा स्टेडियम परिसरातील 700 खोल्यांचा वापर केला जाईल. या स्पर्धेत क्रीडापटूं आणि क्रीडाधिकारी असे एकूण 7500 जणांचा सहभाग राहील.