ऑनलाईन टीम / तरुण भारत :
संविधान वाचवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची हत्या करा, असं खळबळजनक वक्तव्य मध्यप्रदेश काँग्रेसचे माजी आमदार राजा पटेरिया (Raja Pateria) यांनी एका कार्यक्रमात केले. या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, भाजप पटेरिया यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे.
राजा पटेरिया यांनी रविवारी पन्ना येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “येत्या काळात पंतप्रधान मोदी देशातील निवडणुका संपवतील. धर्म, जात, भाषेच्या आधारावर ते फूट पाडतील, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांचे जीव धोक्यात येतील. संविधान वाचवायचे असेल तर मोदींची हत्या करा. दरम्यान, या विधानानंतर पटेरिया यांनी तत्काळ सारवासारव देखील केली. हत्या करा म्हणजे पराभव करा, असं पटेरिया यांनी म्हटलं.
पटेरिया यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, भाजपा प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांच्यासह अन्य नेत्यांनी पटेरिया यांच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईची मागणी केली. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनुसार, पन्ना पोलिसांनी पटेरिया यांच्याविरोधात शांतता भंग आणि असंतोष पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : सीमावादावर केंद्राच्या हालचालींना वेग; आमित शाहांनी बोलावली दोन्ही राज्यांची बैठक