आर्थिक व्यवहारातून वितुष्ट : संशयित आरोपीला अटक, दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी
बेळगाव : हातउसने दिलेले पैसे व मोबाईल परत केले नाहीत म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राचे शिर धडावेगळे करून भीषण खून केल्याची घटना रायबाग तालुक्यातील बस्तवाड जंगल परिसरात घडली आहे. शुक्रवारी सकाळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला असून हारुगेरी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. अकबर शब्बीर जमादार (वय 22) रा. हारुगेरी, ता. रायबाग असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र महांतेश सोमनिंग पुजारी (वय 24) रा. बडब्याकुड, ता. रायबाग याने गुरुवारी रात्री हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. बस्तवाड जंगल परिसरात खून करून धडावेगळे केलेले शिर महांतेशने आपल्या गावी नेले होते.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी यासंबंधी माहिती दिली आहे. आर्थिक व्यवहार व मोबाईल परत करण्यावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान भीषण खुनात झाले आहे. खून झालेला अकबर व संशयित आरोपी महांतेश हे दोघे मित्र होते. अकबरला महांतेशने हातउसने पैसे दिले होते. आपला मोबाईलही वापरण्यासाठी दिला होता. सतत मागणी करूनही पैसे व मोबाईल परत करण्यात आले नाहीत. याच मुद्द्यावरून अकबर व महांतेश यांच्यात वादावादी झाली. गुरुवारी रात्री 10.30 वाजता महांतेशने अकबरला बस्तवाडजवळील जंगल परिसरात नेले. वादावादीनंतर बाटलीने हल्ला करून त्याचा खून केला. त्यानंतर विळ्याने शिर धडावेगळे करून आपल्या गावी नेले. शुक्रवारी सकाळी शिरविरहीत मृतदेह आढळून आला. हारुगेरी पोलिसांनी तो ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता हा मृतदेह हारुगेरी येथील अकबरचा असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी स्थानिक चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार महांतेशला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने अकबरचे शिर ठेवलेली जागा दाखविली. त्यानंतर पोलिसांनी ते जप्त केले. अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रविचंद्र डी. बी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अकबरची आई कैरून जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघांवरही पोलिसांत गुन्हे…
खून झालेला अकबर व संशयित आरोपी महांतेश या दोघांवरही हारुगेरी पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. अकबरवर म्हशी चोरल्याची दोन प्रकरणे तर गैरवर्तनासंबंधीचीही दोन प्रकरणे नोंद आहेत. तर संशयित महांतेशवर लुटमारीचे दोन व एक चोरी प्रकरण नोंद आहे. हे दोघेही चांगले मित्र, मात्र आर्थिक व्यवहारामुळे दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.