हल्लेखोर आले वकिलाच्या वेशात : गोळीबार करून फरार
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याची भरदिवसा न्यायालय आवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लखनौच्या कैसरबाग येथील कोर्ट पॅम्पसमध्ये बुधवारी दुपारी ही घटना घडली. हल्लेखोर वकिलाच्या वेशात आले होते. गुन्हा करून हल्लेखोर फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी नाकेबंदी करून तपास केला जात आहे. घटनास्थळीही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या गोळीबारात एक मुलगी, एका पोलिसासह चार जण जखमी झाले आहेत.
गोळीबारात मृत झालेला जीवा हा मुख्तार अन्सारीच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. एका प्रकरणातील सुनावणीवेळी न्यायालयात हजेरी लावण्यासाठी जीवाला आणण्यात आले असता गोळीबार झाला. गोळीबार करणारे हल्लेखोर वकिलाच्या वेशात आले होते. त्यांनी जीवावर गोळीबार केला. यानंतर ते पळून गेले. गोळीबारामुळे न्यायालय आवारात गोंधळ आणि धावपळ उडाली. या घटनेनंतर शहरात ठिकठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला असून हल्लेखोरांच्या अटकेसाठी विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
संजीव माहेश्वरी उर्फ जीवा हा मुझफ्फरनगरचा कुख्यात गुंड होता. पोलिसांच्या नोंदीनुसार जीवावर 22 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यापैकी 17 प्रकरणांतून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, तर त्याच्या टोळीत 35 हून अधिक सदस्य आहेत. जीवा कारागृहामधूनच टोळी चालवत असे. व्यापारी अमित दीक्षित उर्फ गोल्डी यांच्या 2017 च्या हत्येप्रकरणीही त्याच्यावर आरोप आहे. यातील तपासानंतर न्यायालयाने जीवासह चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
जीवा हा सुऊवातीच्या काळात रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करायचा. नंतर त्याच रुग्णालयाच्या मालकाचे अपहरण झाले. या घटनेनंतर त्याने 90 च्या दशकात कोलकात्यातील एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून दोन कोटींची खंडणी मागितली होती. यानंतर तो हरिद्वारच्या नाझीम टोळीत प्रवेश केल्यानंतर तो सत्येंद्र बरनालाशी संबंधित होता. पण त्याच्या मनात एक टोळी तयार करण्याची तळमळ होती. सध्या तो लखनौ कारागृहात बंद होता. अलीकडेच प्रशासनाने त्यांची मालमत्ताही जप्त केली होती.
मुख्तारचा निटकवर्तीय
10 फेब्रुवारी 1997 रोजी झालेल्या भाजपचे दिग्गज नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्याप्रकरणात जीवाचा सहभाग उघड झाला होता. या प्रकरणी जीवाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो मुन्ना बजरंगी गँगमध्येही सामील झाला होता. त्याचदरम्यान तो मुख्तार अन्सारीच्या संपर्कात आला होता. मुख्तारला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा शौक होता, तर जीवा याच्याकडे शस्त्रे गोळा करण्याचे जाळे असल्यामुळे दोघेही निकटवर्तीय झाले होते.