ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्ट (TV Artist Amreen Bhat) यांची हत्या केली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली. या शोधमोहिमेदरम्यान गुरुवारी उशिरा झालेल्या चकमकीत अमरीन यांची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले.
शाहिद मुश्ताक भट (रा. बडगाम) आणि फरहान हबीब (रा. पुलवामा) अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.
काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.25) बडगाम जिल्ह्यातील चदूरा गावातअमरीन भट्ट (वय 35) या टीव्ही अभिनेत्रीच्या घरात घुसून दोन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अमरीन गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. त्यानंतर सुरक्षा दलाने विशेष शोधमोहीम हाती घेतली. सर्व ठिकाणांहून दहशतवाद्यांची गुप्त माहिती घेण्यात आली. त्यावेळी हे दोन्ही दहशतवादी अवंतीपुराच्या अगनहंजीपोरा भागात लपून बसल्याचे समजले. गुरुवारी रात्री उशिरा सुरक्षा दलाने त्यांना घेरलं. त्यानंतर बराच काळ चाललेल्या चकमकीत या दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. त्यांच्या ताब्यातील एके-५६ रायफल, एक पिस्तूल आणि चार लोडेड मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत.
हे दोन्ही दहशतवादी अलीकडेच लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. बुधवारी लष्कर कमांडर लतीफच्या सांगण्यावरून त्यांनी अमरीन भट्ट यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.