घटनेनंतर तणाव : दुचाकी-चारचाकीची मोडतोड; संशयितांच्या घरांवर दगडफेक : एका अल्पवयीनसह सहा जणांना अटक
बेळगाव : गोकाक येथील आदीजांबवनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून या खूनप्रकरणी एका अल्पवयीनसह सहा जणांना अटक करण्यात आली. रविवारी रात्री उशिराने ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संशयित आरोपींच्या घरांवर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. संतोष उर्फ शानूर नागाप्पा पुजारी (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष हा पेट्रोलपंपावर काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून संतोष आणि संशयित आरोपींमध्ये वाद होता. त्यातूनच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यामध्ये संतोषचा बळी गेला आहे.
या घटनेनंतर गोकाक शहर पोलिसांनी तातडीने याप्रकरणी कल्लाप्पा दुर्गाप्पा मेस्त्राr (वय 54), संजय मेस्त्राr (वय 26), सुनील काडाप्पा मेस्त्राr (वय 25), शिवकुमार उर्फ शिवू बसवराज (वय 24), वासुदेव उर्फ वासु मुत्ताप्पा मेस्त्राr (वय 20, सर्व रा. आदीजांबवनगर, गोकाक) यांच्यासह एका अल्पवयीनला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. रविवारी रात्री मयत संतोष पुजारी हा घराजवळ थांबला होता. यावेळी हे सर्वजण अचानक येवून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये संतोषचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. परिसरातील तरुणांनी संशयित आरोपींच्या घरांवर दगडफेक केली. तसेच दुचाकी व चारचाकीची मोडतोड केली. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती गंभीर असल्याने जिल्हा राखीव दलाची एक तुकडी त्याठिकाणी तैनात करण्यात आली. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनीही त्याठिकाणी धाव घेतली. दिवाळी सणातच घटना घडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.